
मुंबई| भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महाराष्ट्रात विशेष सखोल मतदार पुनरिक्षण (एसआयआर) मोहीम राबविण्यात येणार असून राज्यातील सुमारे ९ कोटी ६८ लाख मतदारांच्या नोंदींची घराघरात जाऊन पडताळणी केली जाणार आहे. मतदार यादी अधिक अचूक, पारदर्शक आणि अद्ययावत करण्यासाठी ही मोहीम हाती घेण्यात आली असल्याची माहिती S. Chockalingam यांनी पत्रकार परिषदेत दिली.


मंत्रालयातील विधिमंडळ वार्ताहर कक्ष येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी सह मुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर उपस्थित होते. या मोहिमेंतर्गत ३० जून ते २९ जुलै २०२६ दरम्यान बूथ लेव्हल ऑफिसर (बीएलओ) मतदारांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन गणना अर्जांचे वितरण व संकलन करणार आहेत. पूर्वमुद्रित फॉर्मद्वारे मतदारांची माहिती पडताळण्यात येणार असून नाव, पत्ता, फोटो किंवा इतर तपशीलांमध्ये बदल असल्यास त्याची नोंद करता येणार आहे. तसेच अनुपस्थित, स्थलांतरित, मृत आणि डुप्लिकेट नोंदींची तपासणीही केली जाणार आहे.


२००२ ते २००४ मधील जुन्या मतदार याद्यांशी माहितीचे मॅपिंग उपलब्ध असल्यास अतिरिक्त कागदपत्रांची आवश्यकता भासणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले. मोहीमेअंतर्गत ५ ऑगस्ट २०२६ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार असून ५ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान दावे व हरकती नोंदविता येणार आहेत. ७ ऑक्टोबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.


राज्यातील सुमारे १ लाख २५ हजारांहून अधिक बीएलओ तसेच विविध राजकीय पक्षांचे बूथ लेव्हल एजंट्स या प्रक्रियेत सहभागी होणार आहेत. कोणत्याही पात्र मतदाराचे नाव अन्यायकारकरीत्या वगळले जाणार नाही तसेच प्रक्रिया पूर्णपणे निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने राबविली जाईल, अशी ग्वाही मुख्य निवडणूक अधिकारी यांनी दिली.


