
हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार| छोट्याशा हिमायतनगर शहरातून मोठी झेप घेत सोशल मीडियाच्या विश्वात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या श्रीमयी शितल श्रीनिवास सूर्यवंशी हिने पुन्हा एकदा आपल्या यशाचा ठसा उमटवला आहे. आपल्या अप्रतिम नृत्यकला, मनमोहक हावभाव आणि आकर्षक सादरीकरणाच्या जोरावर लाखो चाहत्यांची मने जिंकणाऱ्या हिमायतनगरच्या या कन्येचा पुण्यात एका भव्य सोहळ्यात सन्मान करण्यात आला.


प्रसिद्ध माध्यम समूह ‘नवभारत-नवराष्ट्र’ यांच्या वतीने पुण्यातील पंचतारांकित हॉटेल हयात रीजन्सी येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘डिजिटल इन्फ्लुएन्सर समिट २०२६’ या प्रतिष्ठित कार्यक्रमात श्रीमयीला मानाचा ‘डिजिटल इन्फ्लुएन्सर अवॉर्ड’ प्रदान करून गौरविण्यात आले. या पुरस्कारामुळे हिमायतनगरसह संपूर्ण नांदेड जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.


श्रीमयी सूर्यवंशी हिने यापूर्वी स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय डान्स रिअॅलिटी शो ‘मी होणार सुपरस्टार’ मध्ये फायनलिस्ट म्हणून आपली छाप पाडली होती. त्या मंचावरील दमदार कामगिरीनंतर तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या कलेला नवी दिशा दिली. आज ती इन्स्टाग्राम आणि युट्युबवर ‘एक्सप्रेशन क्वीन’ म्हणून ओळखली जाते. तिच्या डान्स रील्सना लाखो-कोट्यवधी व्ह्यूज मिळत असून, ५.५ लाखांहून अधिक फॉलोअर्सचा भक्कम चाहतावर्ग तिच्या पाठीशी उभा आहे.


एका छोट्या शहरातून मोठी स्वप्ने पाहत मेहनतीच्या जोरावर पुण्यासारख्या महानगरातील प्रतिष्ठित मंचावर पोहोचलेली श्रीमयी आज अनेक तरुणींसाठी प्रेरणास्थान बनली आहे. तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल हिमायतनगरचे प्रतिष्ठित व्यापारी रामराव पाटील सूर्यवंशी (आजोबा), तिचे आई-वडील तसेच संपूर्ण सूर्यवंशी परिवाराकडून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



हिमायतनगरची ही कन्या आज केवळ सोशल मीडिया स्टार नाही, तर मेहनत, जिद्द आणि कलेच्या जोरावर मोठे स्वप्न साकार करणाऱ्या नव्या पिढीचे प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे. तिच्या या यशामुळे हिमायतनगर व नांदेड जिल्ह्याचे नाव राज्यभरात अभिमानाने झळकले असून, सर्व स्तरांतून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
