
तहसीलदार व टीमच्या नियोजनाला शाबासकी
प्रगणक शिक्षक एल. जी. वाघमारे यांचे काम पूर्ण; केंद्रीय पथकाकडून सत्कार
लोहा | लोहा तालुक्यात सुरू असलेल्या जनगणना 2027 च्या कामकाजाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय जनगणना पथकाने शुक्रवारी (दि. 22 मे) तहसील कार्यालयाला भेट देत ग्रामीण व शहरी भागातील कामाचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी तहसीलदार विठ्ठल परळीकर यांच्या नियोजनबद्ध कामकाजाचे तसेच जनगणनेच्या प्रगतीचे कौतुक करत केंद्रीय पथकाने त्यांच्या टीमला शाबासकी दिली.


केंद्रीय पथकात जनगणना सहसंचालक श्री शर्मा, सहाय्यक संचालक श्री पांडे, बी. प्रसाद तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील जनगणना कक्षाचे सहायक लतीफ पठाण यांचा समावेश होता. पथकाने ग्रामीण व शहरी भागातील पर्यवेक्षक आणि अधिकाऱ्यांसोबत तहसील कार्यालयात बैठक घेऊन जनगणनेच्या कामाचा आढावा घेतला.


लोहा तालुक्यात ग्रामीण जनगणना कामासाठी 64 पर्यवेक्षक आणि 359 प्रगणक, तर शहरासाठी 8 सुपरवायझर आणि 48 प्रगणक नियुक्त करण्यात आले आहेत. शहरातील जनगणना कामकाजाचे नियंत्रण प्रभारी मुख्याधिकारी संदीप भोळे यांच्याकडे आहे.


बैठकीत तहसीलदार विठ्ठल परळीकर आणि मुख्याधिकारी संदीप भोळे यांनी जनगणनेच्या कामाचा प्रगती अहवाल सादर करत केलेल्या नियोजनाची माहिती दिली. यावेळी सहसंचालक श्री शर्मा आणि सहाय्यक संचालक श्री पांडे यांनी आवश्यक सूचना देत अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.


तालुक्यातील जनगणना कामात उल्लेखनीय कामगिरी करत ग्रामीण चार्ज अंतर्गत सर्वप्रथम नियुक्त काम पूर्ण करणारे प्रगणक शिक्षक लिंगोजी गणपती (एल. जी.) वाघमारे यांचा केंद्रीय पथकाच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यांच्या सोबत संबंधित पर्यवेक्षकांचाही गौरव करण्यात आला.

तहसीलदार तथा ग्रामीण चार्ज अधिकारी विठ्ठल परळीकर यांनी सर्व 64 पर्यवेक्षक आणि 359 प्रगणकांच्या माध्यमातून जनगणनेचे काम अचूक व वेळेत पूर्ण करण्याचा विश्वास व्यक्त केला. यासाठी नायब तहसीलदार तथा जनगणना सहाय्यक अधिकारी श्रीमती कावेरी खोडवे, तांत्रिक सहाय्यक श्याम मारतळेकर आणि इतर कर्मचारी विशेष परिश्रम घेत असल्याचे त्यांनी सांगितले.
केंद्रीय पथकाने लोहा तालुक्यातील जनगणना कामाच्या वेग, नियोजन आणि अंमलबजावणी बद्दल समाधान व्यक्त करत प्रशासनाच्या प्रयत्नांचे कौतुक केले.
