
नांदेड | नांदेड येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार लक्ष्मणराव मारोतीराव भवरे (कामारीकर) यांना यंदाचा “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय प्रेरणा पुरस्कार” जाहीर करण्यात आला आहे. त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक, पर्यावरणीय आणि पत्रकारितेतील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत हा सन्मान जाहीर करण्यात आला आहे.


भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित पुरस्कार वितरण सोहळा शनिवार, दि. 23 मे रोजी नाशिक येथील समुद्र लॉन्स येथे पार पडणार आहे. या सोहळ्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू व रिपब्लिकन सेनेचे सरसेनापती आनंदराज आंबेडकर यांच्या हस्ते तसेच पणतू व रिपब्लिकन सेनेचे युवा नेते अॅड. अमन आंबेडकर यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.


या कार्यक्रमास नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे उपायुक्त भगवान वीर, जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश गायकवाड, नाशिक महानगर पालिकेचे सहायक उपायुक्त नानासाहेब साळवे, रिपब्लिकन सेनेचे राज्य प्रवक्ते अविनाश शिंदे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.


ज्ञानदीप सामाजिक विकास संस्था, महाराष्ट्र यांच्या वतीने देशभरातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार प्रदान केला जातो. यावर्षी नांदेड जिल्ह्याचे सुपुत्र लक्ष्मणराव भवरे यांची निवड करण्यात आली आहे.


पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत जनसामान्यांचे प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचवणे, भारतीय संविधानाचा प्रचार-प्रसार, वृक्षलागवड व संवर्धन, पर्यावरण संरक्षण तसेच शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय सहभाग या कार्याची दखल घेत निवड समितीने त्यांचा गौरव करण्याचा निर्णय घेतला आहे. या पुरस्काराची घोषणा झाल्यानंतर लक्ष्मणराव भवरे यांच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
