
हिमायतनगर | हिमायतनगर तालुक्यातील बळीराम तांडा व पोटा तांडा येथे तांडा वस्ती सुधार योजनेअंतर्गत सुरू असलेल्या रस्ते व नाली बांधकामात अनियमितता होत असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. संबंधित कामांची गुणवत्तापूर्ण चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी पंचायत समिती प्रशासनाकडे केली आहे.


ग्रामस्थांनी पंचायत समिती, हिमायतनगरचे गटविकास अधिकारी यांना दिलेल्या लेखी निवेदनानुसार, पोटा तांडा येथे सि.सी. रस्ता व नाली बांधकामासाठी ७ लाख रुपये, तर बळीराम तांडा येथे पेव्हर ब्लॉक बसविण्यासाठी ७ लाख रुपये असा एकूण १४ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मात्र, या कामांमध्ये निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.


निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, पोटा तांड्यातील सि.सी. रस्ता बांधकामात नाल्याची माती मिसळून काम सुरू असल्याचा आरोप असून, आवश्यक प्रमाणात वाळू, खडी, गजाळी व इतर साहित्य न वापरताच काम उरकले जात असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. शासनाच्या अंदाज पत्रकाकडे दुर्लक्ष करून निधीचा अपव्यय होत असल्याचाही आरोप करण्यात आला आहे.


तसेच संबंधित विभागाच्या ज्युनिअर इंजिनिअर (जे.ई.) यांनी कामांची नियमित पाहणी न केल्यामुळे ठेकेदार व ग्रामपंचायत प्रशासनाच्या संगनमतातून निकृष्ट दर्जाचे काम सुरू असल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.


या प्रकरणाची गुणनियंत्रक यंत्रणेमार्फत सखोल चौकशी करून निकृष्ट दर्जाचे काम तात्काळ थांबवावे तसेच संबंधित कामांची देयके रोखावीत, अशी मागणी माजी सभापती बापूराव आडे, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष धर्मा थावरा राठोड, श्यामराव बाबुराव जाधव, मधूकर पांडू राठोड, भारत धावजी राठोड, टिकाराम धुप्पा राठोड, शेषेराव पवार यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे.
दरम्यान, चौकशी प्रक्रियेत दिरंगाई किंवा टाळाटाळ झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.
