नांदेड परिक्षेत्रात अवैध व्यवसायांवर पोलिसांचा मोठा प्रहार

20 व्या दिवशी 56 गुन्हे दाखल, 73 लाखांचा मुद्देमाल जप्त, ब्राऊन शुगर हस्तगत 
नांदेड | नांदेड परिक्षेत्रात सुरू असलेल्या अवैध व्यवसाय विरोधी मोहिमेला वेग आला असून, मोहिमेच्या 20 व्या दिवशी आणखी 56 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विविध कारवायांमध्ये एकूण 73 लाख 93 हजार 630 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, नांदेड शहरात ब्राऊन शुगरही हस्तगत करण्यात आली आहे.

पोलीस विभागाकडून 1 ते 31 मे 2026 या कालावधीत नांदेड परिक्षेत्रात विशेष अवैध व्यवसाय विरोधी मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत मटका जुगार खेळणाऱ्या व खेळविणाऱ्या 13 इसमांविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायद्यांतर्गत 11 गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्यांच्याकडून 43 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

तसेच, अवैध दारू विक्री करणाऱ्या 38 इसमांविरुद्ध 36 गुन्हे दाखल करून 4 लाख 81 हजार 540 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अवैध वाळू उपसा करणाऱ्या 3 इसमांविरुद्ध 2 गुन्हे दाखल करून तब्बल 55 लाख 15 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

याशिवाय, शस्त्र अधिनियमांतर्गत 2, कोटपा कायद्यांतर्गत 2 आणि इतर अधिनियमांखाली विविध कारवाया करण्यात आल्या. एकूण 56 कारवायांमध्ये आरोपींकडून 73 लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, नांदेड शहरातील वजिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत 72.03 ग्रॅम ब्राऊन शुगर जप्त करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

अवैध व्यवसायांची माहिती थेट पोलिसांपर्यंत पोहोचावी यासाठी पोलीस उप महानिरीक्षक कार्यालयाने ‘खबर’ हेल्पलाईन सुरू केली असून, नागरिकांकडून यास चांगला प्रतिसाद मिळत आहे. 9150100100 या मोबाईल क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप संदेशाद्वारे अवैध व्यवसायांची माहिती देण्याचे आवाहन पोलीस उप महानिरीक्षकांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!