
नांदेड | नांदेड शहरातील वाढत्या अनधिकृत होर्डिंग्स आणि बॅनरबाजीवर कठोर कारवाई करण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे सर्वपक्षीय नेते, लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक पार पडली. राज्य शासन व उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ही कारवाई राबविण्यात येणार असून, विनापरवाना जाहिरात फलक लावणाऱ्यांवर थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.


बैठकीस महापौर कविता संतोष मुळे, जिल्हाधिकारी राहुल कर्डीले, पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, महानगरपालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, पोलीस उपविभागीय अधिकारी व्यंजने, प्रशांत शिंदे यांच्यासह उपमहापौर दिपकसिंह रावत, स्थायी समिती सभापती विरेंद्रसिंग गाडीवाले, महिला व बाल कल्याण सभापती सदिच्छा सोनी पाटील, अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, निलेश संकेवार, उपायुक्त अजितपालसिंग संधु तसेच सर्वपक्षीय नेते व सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.


बैठकीच्या प्रारंभी महापालिकेच्या वतीने राज्य शासनाच्या निर्देशांनुसार आणि माननीय उच्च न्यायालयातील जनहित याचिका क्र. १५५/२०११ मधील ३१ जानेवारी २०१७ च्या आदेशानुसार आकाशचिन्ह व जाहिरात विनियम नियंत्रण कार्यपद्धतीबाबत सादरीकरण करण्यात आले.



शहरातील अनधिकृत होर्डिंग्स व बॅनरबाजी रोखण्यासाठी महानगरपालिका आणि पोलीस प्रशासन संयुक्तपणे निष्कासन मोहीम राबविणार असून, कारवाईदरम्यान मनपा कर्मचाऱ्यांना पूर्ण पोलीस संरक्षण देण्यात येईल, असे आश्वासन पोलीस अधीक्षकांनी दिले.


याशिवाय, विनापरवाना होर्डिंग्स लावणारे तसेच संबंधित जबाबदार व्यक्तींवर थेट FIR दाखल करण्यात येणार आहे. शहरातील अधिकृत जाहिरात फलकांचेही सुरक्षिततेच्या दृष्टीने स्ट्रक्चरल ऑडिट तातडीने करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

महानगरपालिकेकडून शहरात सध्या १६७ अधिकृत जाहिरात फलक उपलब्ध करून देण्यात आले असून, अनधिकृत मोठ्या होर्डिंग्सवर दंडात्मक कारवाईचे धोरणही आखण्यात येत असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. प्रशासनाच्या या निर्णयामुळे शहरातील अनधिकृत बॅनरबाजी व होर्डिंग्सना आळा बसणार का, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.
