
नांदेड| भारतीय रेल्वेतर्फे 15 मे ते 5 जून 2026 या कालावधीत “हवामान बदल व पर्यावरण संरक्षण” या विषयावर जागतिक पर्यावरण दिन अभियान राबविण्यात येत असून, त्याअंतर्गत दक्षिण मध्य रेल्वेच्या हज़ूर साहिब नांदेड मंडळात विविध जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.


मंडल रेल व्यवस्थापक कार्यालय, हज़ूर साहिब नांदेड येथे पर्यावरण संरक्षण शपथ व स्वाक्षरी अभियान आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमात रेल्वे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उत्साहाने सहभाग घेत पर्यावरण संरक्षण व शाश्वत जीवनशैली अंगीकारण्याचा संकल्प केला.


यावेळी विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्री प्रदीप कामले यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना पर्यावरण संरक्षणाची शपथ दिली. दैनंदिन जीवनात पर्यावरणपूरक बदल करण्यासह कुटुंबीय, मित्र आणि समाजातील इतर नागरिकांनाही पर्यावरण संवर्धनासाठी प्रेरित करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.


याशिवाय हज़ूर साहिब नांदेड, छत्रपती संभाजीनगर, जालना, नगरसूल, परभणी, पूर्णा आणि वाशिम या रेल्वे स्थानकांवरही पर्यावरण संरक्षण शपथ कार्यक्रम घेण्यात आले. या उपक्रमातून रेल्वे कर्मचारी आणि प्रवाशांमध्ये हवामान बदल व पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती करण्यात आली.



रेल्वे बोर्डाच्या निर्देशानुसार “मिशन लाइफ (Lifestyle for Environment)” अंतर्गत हे अभियान राबविण्यात येत असून, जनसहभागातून पर्यावरण संरक्षणाबाबत जागरूकता निर्माण करणे हा त्यामागील प्रमुख उद्देश आहे.
नांदेड रेल्वे मंडळ पर्यावरण संरक्षण व शाश्वत विकासासाठी कटिबद्ध असून, सर्व नागरिकांनी आपल्या दैनंदिन जीवनात पर्यावरणपूरक सवयी अंगीकाराव्यात, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
