नांदेडमध्ये आपले सरकार सेवा केंद्रासाठी पारदर्शक मुलाखती; ५६९ उमेदवारांची प्रक्रिया पूर्ण

नांदेड| नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील १३६२ आपले सरकार सेवा केंद्रांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवार, १५ मे रोजी प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात आल्या. जिल्हा सेतू समितीच्या वतीने आयोजित या प्रक्रियेत अर्धापूर, उमरी, कंधार, किनवट, देगलूर, धर्माबाद, नांदेड आणि माहूर या आठ तालुक्यांतील ५६९ उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या.

ग्रामीण भागातील आपले सरकार सेवा केंद्रांसाठी अर्ज मागविण्यात आले होते. प्राप्त अर्जांची छाननी पूर्ण झाल्यानंतर १५ मेपासून मुलाखत प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली. या प्रक्रियेसाठी उपजिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्या उपस्थितीत एकूण १२ स्वतंत्र मुलाखत कक्षांची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच उमेदवारांच्या मार्गदर्शनासाठी आठ तालुक्यांसाठी स्वतंत्र कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती.

मुलाखतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात ऊन व पावसापासून संरक्षण मिळावे यासाठी मोठ्या मंडपाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक आणि गोपनीय पद्धतीने पार पडावी यासाठी रँडम पद्धतीचा अवलंब करण्यात आला. तालुक्यांचे १२ गट करून त्यांचे संबंधित मुलाखत कक्षांना वेळेवर वाटप करण्यात आले. त्यामुळे कोणत्या उमेदवाराची मुलाखत कोणत्या अधिकाऱ्याकडून होणार, याची माहिती मुलाखतीच्या दिवसापर्यंत गोपनीय ठेवण्यात आली होती.

निवासी उपजिल्हाधिकारी किरण आंबेकर यांनी तालुकानिहाय उमेदवारांना त्यांच्या मुलाखत कक्षाबाबत तसेच नियुक्त कर्मचाऱ्यांबाबत माहिती देत संपूर्ण प्रक्रियेत प्रभावी समन्वय साधला. जिल्हा प्रशासनाने कोणत्याही प्रकारच्या मध्यस्थी किंवा गैरप्रकारांना वाव न देता प्रक्रिया निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने राबविली.

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली ही मुलाखत प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी किरण आंबेकर यांनी दिली. उर्वरित आठ तालुक्यांतील ६५१ उमेदवारांच्या मुलाखती शनिवार, १६ मे रोजी घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!