QR स्कॅनद्वारे खत उपलब्धतेची माहिती; शेतकऱ्यांना घरबसल्या सुविधा

योग्य दरात खत मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे आवाहन

हिमायतनगर, अनिल मादसवार | खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना खत उपलब्धतेबाबत अडचणी येऊ नयेत यासाठी आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. शेतकरी बांधवांना आपल्या नांदेड जिल्ह्यात, तालुक्यात तसेच हिमायतनगर शहरातील कोणत्या दुकानदाराकडे किती खत उपलब्ध आहे याची माहिती QR स्कॅनद्वारे घरबसल्या मिळणार आहे.

या सुविधेमुळे शेतकऱ्यांना खतासाठी विविध दुकानांवर वारंवार फेऱ्या मारण्याची गरज राहणार नाही. QR कोड स्कॅन केल्यानंतर संबंधित दुकानात कोणत्या प्रकारचे खत उपलब्ध आहे, किती स्टॉक शिल्लक आहे तसेच दुकानदाराची माहितीही पाहता येणार आहे.

शेतकरी बांधवांनी सरकारने निश्चित केलेल्या दरापेक्षा अधिक पैसे देऊ नयेत, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वामनराव पाटील वडगांवकर यांच्या वतीने करण्यात आले आहे. विशेषतः युरिया खताची अधिकृत किंमत ₹२६६ असून त्यापेक्षा जास्त दर देऊ नका, असे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच इतर खतांच्या गोण्यांवर नमूद केलेल्या निश्चित दरानुसारच पैसे द्यावेत, असेही सांगण्यात आले.

QR स्कॅनरवर ज्या दुकानात खत उपलब्ध असल्याचे दिसून येत आहे, त्या दुकानदाराकडे जाऊन शेतकऱ्यांनी आपला हक्काचा माल मागावा, असे आवाहन करण्यात आले आहे. कोणत्याही दुकानदाराने खत देण्यास नकार दिल्यास किंवा जादा दराची मागणी केल्यास संबंधितांशी तात्काळ संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

शेतकरी हित लक्षात घेऊन ही माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने प्रसारित करण्यात आली असून, वेळ प्रसंगी शेतकरी हितासाठी कोणत्याही क्षणी हाक द्या असे आवाहन सोशल मीडियाच्या माध्यमातून करत “शेतकऱ्यांचा हक्क – योग्य दरात खत” हा संदेश देण्यात आला असल्याचे वामनराव पाटील वडगांवकर यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!