
शौर्य, संस्कार आणि राष्ट्रसेवेचे प्रेरणादायी प्रात्यक्षिक


हिमायतनगर, अनिल मादसवार | विश्व हिंदू परिषद देवगिरी प्रांत आयोजित दुर्गावाहिनी शौर्य प्रशिक्षण वर्गाच्या निमित्ताने शहरातील प्रमुख मार्गांवरून गुरुवार दिनांक 14 च्या रात्री भव्य शोभायात्रा काढण्यात आली. उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या शोभायात्रेत सहभागी युवतींनी विविध शौर्य प्रात्यक्षिके सादर करत नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.


शहरात भगवे ध्वज, घोषणाबाजी आणि पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या दुर्गावाहिनीच्या युवतींमुळे परिसरात राष्ट्रभक्ती आणि संस्कारमय वातावरण निर्माण झाले होते. आत्मसंरक्षण, शिस्त, संघटन आणि राष्ट्रसेवेचा संदेश देणाऱ्या या शोभायात्रेला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.


दुर्गावाहिनीच्या माध्यमातून राष्ट्रभक्त, संस्कारित आणि स्वाभिमानी युवती घडविण्याचे महत्त्व या शोभायात्रेतून अधोरेखित करण्यात आले. प्रशिक्षण वर्गात युवतींना शौर्य, संस्कार, संघटन कौशल्य, आत्मसंरक्षण तसेच सामाजिक आणि राष्ट्रीय कर्तव्यांची जाणीव करून दिली जात आहे.



या शिबिरात एकूण ६५ युवती सहभागी झाल्या असून त्यामध्ये ५० दुर्गा, १५ शिक्षिका आणि १ बालदुर्गेचा समावेश आहे. प्रशिक्षणादरम्यान विविध शारीरिक कवायती, दंड प्रशिक्षण, आत्मसंरक्षण तंत्र तसेच सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.
आत्मसंरक्षण, संघटन कौशल्य आणि सांस्कृतिक मूल्यांचा संगम असलेला हा प्रशिक्षण वर्ग परिसरात विशेष आकर्षणाचा विषय ठरत असून, भविष्यात समाजकार्य आणि राष्ट्रकार्यासाठी सक्षम मातृशक्ती घडविण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण मानला जात आहे. या उपक्रमाचे सर्व स्तरातून स्वागत व अभिनंदन केले जात आहे.
