
शारीरिक, बौद्धिक, संघटनात्मक आणि सेवाकार्याचे मिळणार प्रशिक्षण
छत्रपती संभाजीनगर/जामनेर | राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देवगिरी प्रांताचा (मराठवाडा व खान्देश) १५ दिवसीय संघ शिक्षा वर्ग यावर्षी जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथे आयोजित करण्यात आला आहे. ललवाणी महाविद्यालयाच्या परिसरात दि. १६ मे ते ३० मे २०२६ या कालावधीत हा निवासी वर्ग संपन्न होणार असून, देवगिरी प्रांतातील अकरा जिल्ह्यांमधून १२० स्वयंसेवक शिक्षार्थी यात सहभागी होणार आहेत.


स्वयंसेवकांच्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने दरवर्षी संघ शिक्षा वर्गांचे आयोजन केले जाते. यावर्षी जामनेर येथे होणाऱ्या या वर्गात स्वयंसेवकांना शारीरिक, बौद्धिक, संघटनात्मक, व्यवस्थापकीय तसेच सेवाकार्याचे सखोल प्रशिक्षण दिले जाणार आहे.


कठोर शिस्त आणि सर्वांगीण प्रशिक्षण
१५ दिवसांच्या या निवासी वर्गात पहाटे ४.३० वाजता दिवसाची सुरुवात होऊन रात्री १० वाजेपर्यंत विविध सत्रांद्वारे प्रशिक्षण दिले जाईल. सहभागी स्वयंसेवकांना घोष वादनाचे विशेष प्रशिक्षणही दिले जाणार असून, त्याचाच भाग म्हणून वर्ग परिसरातून एक दिवस सघोष संचलन काढण्यात येणार आहे.


हा वर्ग केवळ प्रशिक्षणापुरता मर्यादित नसून स्वयंसेवकांसाठी साधना, शिस्त आणि राष्ट्रसेवेची प्रेरणा देणारा उपक्रम मानला जातो. विशेष म्हणजे, संपूर्ण वर्ग व्यवस्था पर्यावरणपूरक ठेवण्यात येणार असून प्लास्टिकचा वापर टाळून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात येणार आहे.


अखिल भारतीय अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन
या वर्गासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह सरकार्यवाह श्री रामदत्तजी चक्रधर आणि अखिल भारतीय सहप्रचार प्रमुख मा. प्रदीपजी जोशी यांचे विशेष मार्गदर्शन लाभणार आहे. तसेच विविध क्षेत्रीय अधिकाऱ्यांचाही वर्गादरम्यान प्रवास होणार आहे.
वर्गाधिकारी म्हणून मुकुंदराव चौधरी (परभणी जिल्हा संघचालक) आणि श्रीरामजी धसे (खडकी जिल्हा संघचालक) कार्य पाहणार आहेत.
लोकसहभागातून उभारली जाणारी व्यवस्था
या संघ शिक्षा वर्गाच्या व्यवस्थापनात समाजातील विविध स्तरांतील सज्जनशक्तीचा सहभाग राहणार आहे. जामनेर शहरातील अनेक स्वयंसेवी संस्था आणि संघटना प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे या कार्यात सहभागी होत आहेत.
विशेष म्हणजे, शिक्षार्थींच्या भोजनासाठी आवश्यक हजारो पोळ्या दररोज शहरातील विविध कुटुंबांकडून संकलित केल्या जाणार आहेत. भोजन व्यवस्था आणि पोळी संकलन कार्यात जामनेरमधील मातृशक्तीचा मोठा सहभाग राहणार असून, समाजातील प्रत्येक घटकाला राष्ट्रकार्यात सहभागी करून घेण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जात आहे.
३० मे रोजी समारोप
या वर्गाचा समारोप दि. ३० मे रोजी सायंकाळी होणार असून, यावेळी स्वयंसेवकांकडून १५ दिवसांच्या प्रशिक्षणाचे विविध प्रात्यक्षिक सादर करण्यात येणार आहेत. या समारोप कार्यक्रमाला जामनेर शहरातील नागरिक, माता-भगिनी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन वर्गाधिकारींनी केले आहे. या प्रशिक्षण वर्गामुळे स्वयंसेवकांमध्ये राष्ट्रभक्ती, शिस्त, संघटन कौशल्य आणि सेवावृत्ती अधिक दृढ होईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
