
लालवंडी येथे ‘सबसॉइलर’ व पीक अवशेष व्यवस्थापन तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक; खरीपपूर्व मोहिमेचा आढावा
नांदेड | बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर शेती अधिक शाश्वत, उत्पादनक्षम आणि खर्चिकदृष्ट्या फायदेशीर करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी Rahul Kardile यांनी केले. शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीसोबत आधुनिक कृषी अवजारे आणि तंत्रज्ञानाची जोड देत शेती समृद्ध करण्यावर भर द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.


तालुक्यातील मौजे लालवंडी येथे संस्कृती संवर्धन मंडळ, कृषी विज्ञान केंद्र सगरोळी आणि हवामान अनुकूल शाश्वत विकास प्रकल्प (BCRC) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कृषी तंत्रज्ञान प्रात्यक्षिक कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत, संस्कृती संवर्धन मंडळाचे चेअरमन प्रमोद देशमुख, उपविभागीय कृषी अधिकारी व्ही. बी. गित्ते, तालुका कृषी अधिकारी दीपेश देवरे तसेच कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


आधुनिक कृषी अवजारांचे प्रात्यक्षिक
कार्यक्रमात पीक अवशेष व्यवस्थापनासाठी ‘ट्रॅक्टरचलित श्रेडर’ तसेच जमिनीतील कठीण थर फोडून पाणी मुरवण्याची क्षमता वाढवणाऱ्या ‘सबसॉइलर’ या आधुनिक यंत्रांचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी या तंत्रज्ञानाची पाहणी करून जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.



खरीपपूर्व मोहिमेचा आढावा
प्रात्यक्षिकानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘खरीप हंगाम पूर्व गाव मोहिमे’चा आढावा घेतला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना पेरणीपूर्वी बियाण्यांची उगवण क्षमता तपासणे, बीजप्रक्रिया करूनच पेरणी करणे तसेच खर्च कमी करण्यासाठी घरचेच सोयाबीन बियाणे वापरण्याबाबत मार्गदर्शन केले.



महिला बचत गटांसाठी ‘कृषी अवजारे बँक’
कार्यक्रमात नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (PoCRA) अंतर्गत महिला बचत गटांसाठी सुरू करण्यात आलेल्या ‘कृषी अवजारे बँक’ योजनेची माहिती देण्यात आली. कृषी क्षेत्रातील यांत्रिकीकरणात महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी ही योजना महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या कार्यक्रमास लालवंडी व परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कृषी विज्ञान केंद्राच्या तज्ज्ञांनी आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या विविध शंकांचे निरसन करून तांत्रिक मार्गदर्शन केले.
