हिमायतनगरातील स्विमिंग पूलमध्ये बुडून ९ वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

निष्काळजीपणाचा आरोप; परिसरात हळहळ व्यक्त

नांदेड/हिमायतनगर | हिमायतनगर शहरातील एका स्विमिंग पूलमध्ये बुडून ९ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली असून, संपूर्ण तालुक्यात शोककळा पसरली आहे. सक्षम गायकवाड असे मृत मुलाचे नाव असून तो इयत्ता तिसरीत शिक्षण घेत होता.

मिळालेल्या माहितीनुसार, सक्षम नागराज गायकवाड हा किनवट तालुक्यातील इस्लापूर सर्कलमधील भिसी गावचा रहिवासी होता. तो आपल्या आईसोबत मामाच्या गावी लग्नसमारंभ साठी हिमायतनगर येथे आला होता. दरम्यान, स्विमिंग पूलमध्ये पोहण्याचा हट्ट केल्याने आई त्याला घेऊन गेली होती. मात्र पोहत असताना पाण्यात बुडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच चिमुकल्याच्या आईने रुग्णालयात धाय मोकलून आक्रोश केला. “पोटचा गोळा” गमावल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, ही घटना पाहून उपस्थितांच्याही डोळ्यांत अश्रू आले. दरम्यान, स्विमिंग पूल व्यवस्थापनाच्या निष्काळजी- पणामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप नातेवाईकांकडून करण्यात येत आहे. घटनेनंतर पोलिसांनी संबंधित स्विमिंग पूल बंद करण्याच्या सूचना दिल्याची माहिती समोर आली आहे.

या प्रकरणी हिमायतनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. मृत मुलाचा मृतदेह हिमायतनगर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला. या दुर्दैवी घटनेमुळे हिमायतनगर तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात असून, नागरिकांकडून स्विमिंग पूल सुरक्षेबाबत कठोर नियमांची मागणी केली जात आहे.

💐 भावपूर्ण श्रद्धांजली – सक्षम गायकवाड 💐

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!