
मुख्यमंत्री सहायता निधीच्या पुढाकारातून नांदेडमध्ये व्यापक आरोग्य मोहिमेची तयारी


नांदेड | ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा गावपातळीवर उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या पुढाकारातून “निरामय नंदीग्राम” या व्यापक आरोग्य अभियानाचा आराखडा नांदेड जिल्ह्यात तयार करण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून आणि मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली या अभियानाच्या प्राथमिक नियोजन बैठकीचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे करण्यात आले.


मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे प्रशासकीय वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वानंद सोनार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस शासनाचे विविध विभाग, राष्ट्रीयकृत व खासगी बँका, CSR दाते उद्योगसमूह, सेवाभावी संस्था, वैद्यकीय तज्ज्ञ तसेच खासगी रुग्णालयांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


यावेळी डॉ. स्वानंद सोनार यांनी बोलताना सांगितले की, “आरोग्य सेवा केवळ शहरापुरती मर्यादित न राहता ती ग्रामीण आणि तळागाळातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचली पाहिजे. शासन, सामाजिक संस्था, CSR दाते, सार्वजनिक बँका आणि खासगी रुग्णालयांनी समन्वयाने कार्य केल्यास प्रभावी आरोग्य व्यवस्था उभारता येईल.”



बैठकीत ग्रामीण भागातील कर्करोग, ॲनिमिया, दूषित पाण्यामुळे होणारे आजार, COPD, त्वचारोग तसेच असंसर्गजन्य आजारांच्या वाढत्या प्रमाणाबाबत चिंता व्यक्त करण्यात आली. यासाठी ग्रामपातळीवर व्यापक आरोग्य सर्वेक्षण, मोफत तपासणी शिबिरे, महिला आरोग्य जनजागृती आणि प्रभावी संदर्भ उपचार प्रणाली उभारण्यावर भर देण्यात आला.
या अभियानांतर्गत “चरणसेवा”, “नमो नेत्र संजीवनी”, “आरोग्याचा श्री गणेशा”, “एक हात मदतीचा” आणि “हिंद दी चादर” यांसारख्या विविध आरोग्य मोहिमांचा आढावा सादर करण्यात आला. सार्वजनिक-खासगी भागीदारी (PPP मॉडेल)च्या माध्यमातून कोणताही थेट शासकीय निधी न वापरता ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना तपासणी, शस्त्रक्रिया, औषधोपचार आणि वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

बैठकीस जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पेरके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष सूर्यवंशी, महानगरपालिका आरोग्य अधिकारी डॉ. हनमंत रिठ्ठे यांच्यासह विविध बँका, उद्योगसमूह, खासगी रुग्णालये आणि सेवाभावी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
दरम्यान, नांदेड पोलिस दलासाठी विशेष व्यापक आरोग्य सर्वेक्षण व चिकित्सा सेवा उपक्रम राबविण्याबाबत पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार आणि डॉ. स्वानंद सोनार यांच्यात सविस्तर चर्चा झाली. पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी विशेष आरोग्य तपासणी, समुपदेशन व उपचार सेवा उपलब्ध करून देण्याचे नियोजन यावेळी मांडण्यात आले.

बैठकीनंतर भगवती हॉस्पिटल, ग्लोबल हॉस्पिटल, निर्मल न्युरो केअर हॉस्पिटल, आयकॉन हॉस्पिटल, यशोसाई रुग्णालय तसेच रयत आरोग्य मंदिर यांसारख्या प्रमुख रुग्णालयांना भेटी देऊन कामकाजाची पाहणी करण्यात आली.
या अभियानाच्या पहिल्या टप्प्यात प्रत्येक तालुक्यात मोफत प्राथमिक आरोग्य तपासणी सुरू करण्यात येणार असून दुसऱ्या टप्प्यात निदानात्मक चाचण्या व औषधोपचार, तर तिसऱ्या टप्प्यात विविध गंभीर आजारांवरील उपचार यंत्रणा उभारण्यात येणार असल्याची माहिती डॉ. स्वानंद सोनार यांनी दिली.
“ग्रामीण भागातील नागरिकांना वेळेवर उपचार मिळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. शासन, सामाजिक संस्था, CSR दाते, उद्योजक आणि वैद्यकीय संस्था यांनी एकत्रितपणे काम केल्यास आरोग्य सेवा अधिक प्रभावीपणे तळागाळापर्यंत पोहोचविता येईल,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
