नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा २०२७ बोधचिन्हाचे अनावरण

मुंबई| नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचे अनावरण सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  (Devendra Fadnavis)m उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार (sunetra Ajit Pawar) यांच्या हस्ते करण्यात आले.

कुंभमेळ्याच्या बोधचिन्हासाठी कुंभमेळा प्राधिकरणाच्या वतीने देशव्यापी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत तीन हजारांहून अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. निवड प्रक्रियेनंतर तीन उत्कृष्ट स्पर्धकांचा मुख्यमंत्री यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यामध्ये प्रथम क्रमांक पटकावणारे पुणे येथील सुमित काटे (Sumit Kate) यांना तीन लाख रुपयांचा धनादेश व सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांक विजेते नोएडा येथील मयांक नायक (Mayank Nayak) यांना दोन लाख रुपयांचा धनादेश व सन्मानचिन्ह, तर तृतीय क्रमांक विजेते पंढरपूर येथील पीयुष पिंपळनेरकर (Piyush Pimpalnerkar) यांना एक लाख रुपयांचा धनादेश व सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले.

स्पर्धेतील प्रवेशिकांचे परीक्षण ज्येष्ठ डिझाइन तज्ज्ञांच्या समितीमार्फत करण्यात आले. यामध्ये प्रसून जोशी, अश्विनी देशपांडे, मंदार राणे, वृषाली केकणे (देशमुख), बारिश दाते, विनय नारंग, डॉ. प्राजक्ता बास्ते, प्रफुल्ल सावंत, डॉ. दिनेश वैद्य, अँथनी लोपेझ आणि डॉ. किरण शिंदे यांचा समावेश होता. सर्जनशीलता, नाविन्य, ब्रँड सुसंगतता आणि सादरीकरण या निकषांवर आधारित अंतिम निवड करण्यात आली.

कार्यक्रमात कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan), अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal), शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे (Dadaji Bhuse), उद्योग मंत्री उदय सामंत (Uday Samant), सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले (Shivendrasinhraje Bhosale), मुख्य सचिव राजेश अग्रवाल (Rajesh Agrawal), नाशिक विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम (Pravin Gedam) आणि कुंभमेळा प्राधिकरण आयुक्त शेखर सिंह (Shekhar Singh) यांच्यासह विविध आखाड्यांचे साधू-संत उपस्थित होते.

बोधचिन्हाची वैशिष्ट्ये – नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा २०२७ चे बोधचिन्ह नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या पवित्र भूगोल व धार्मिक परंपरांवर आधारित आहे. भगवान शंकराचे त्रिशूळ : आध्यात्मिक उर्जेचे प्रतीक,  त्र्यंबकेश्वर मंदिर (Trimbakeshwar Shiva Temple) : प्रादेशिक वारशाचे दर्शन घडवणारी प्रतिकृती, काळाराम मंदिर (Kalaram Temple) ची कमान आणि गोदावरी नदी (Godavari River) : गोदावरी नदीला शिवलिंगाच्या रूपात दर्शवून पवित्र स्नान परंपरेचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे.

ही स्पर्धा MyGov आणि Association of Designers of India यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती. २० नोव्हेंबर ते २० डिसेंबर २०२५ या कालावधीत झालेल्या या स्पर्धेत ७० आंतरराष्ट्रीय स्पर्धकांसह एकूण ३,०६७ प्रवेशिका प्राप्त झाल्या. सहभागाच्या बाबतीत महाराष्ट्र राज्य आघाडीवर राहिले असून त्याखालोखाल दिल्ली आणि तामिळनाडूचा क्रमांक लागला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!