हिमायतनगर नगरपंचायतीकडून निवासी अतिक्रमण नियमितीकरणासाठी नागरिकांना आवाहन

हिमायतनगर,उत्कर्ष मादसवार | शहरातील वार्ड क्रमांक 01 व 10 मधील नाका गल्ली, शहीद अशोक कामटे चौक, बजरंग चौक आदी परिसरातील नागरिकांना निवासी अतिक्रमण नियमितीकरणासाठी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करण्याचे आवाहन नगरपंचायतीकडून करण्यात आले आहे.

नगरपंचायतीच्या नमुना ४३ अभिलेखात नोंद नसलेल्या जागामालक नागरिकांनी, ते सध्या राहत असलेल्या शासकीय जमिनीवरील दिनांक १ जानेवारी २०११ पूर्वीच्या निवासी अतिक्रमणाचे नियमितीकरण करण्यासाठी अर्ज सादर करावेत, असे सूचनेत नमूद करण्यात आले आहे.

यासाठी अर्जाचा नमुना शहरातील झेरॉक्स सेंटरवर उपलब्ध असून नागरिकांनी अर्जासोबत आधारकार्ड, मोबाईल क्रमांक, कुटुंबाचा तपशील, मतदान ओळखपत्र, सन २०११ पूर्वी मतदार यादीत नाव असल्याचा पुरावा, जागाभाडे क्रमांक, जागाभाडे भरल्याची पावती, वीज बिल तसेच ५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवरील घोषणापत्र जोडणे आवश्यक आहे. याशिवाय मालमत्तेसंदर्भातील इतर शासकीय कागदपत्रेही जोडावीत, असे सांगण्यात आले आहे.

सूचनेनुसार ५०० चौरस फूटपर्यंतचे निवासी क्षेत्र मोफत नियमित करण्यात येणार आहे. तर ५०० ते १५०० चौरस फूट क्षेत्रासाठी बाजारमूल्याच्या १० ते २५ टक्के शुल्क आकारण्यात येणार आहे. भूमी अभिलेख विभागामार्फत संबंधित घरांची मोजणी केली जाणार असून १५०० चौरस फूटपेक्षा जास्त अतिक्रमण नियमित केले जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह सविस्तर अर्ज नगरपंचायत कार्यालयात तात्काळ सादर करावेत, असे आवाहन नगरपंचायत प्रशासनाने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!