
नांदेड| श्री हजूर साहिब, नांदेड येथील गुरुद्वारा सचखंड बोर्डाचे प्रशासक डॉ. विजय सतबीर सिंघ IAS (Retd.) यांनी शैक्षणिक, धार्मिक आणि सामाजिक क्षेत्राशी संबंधित विविध महत्त्वपूर्ण निर्णय घेत अनेक विकासकामांचे उद्घाटन केले. शिक्षणाला प्रोत्साहन देणे तसेच भाविकांना अधिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हे उपक्रम राबविण्यात आले.



सचखंड पब्लिक स्कूल आणि खालसा हायस्कूलमधील इयत्ता दहावी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी बक्षीस रकमेत मोठी वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार 90 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना आता 2100 रुपयांऐवजी 5100 रुपये, 85 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्यांना 1100 रुपयांऐवजी 3100 रुपये, 75 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्यांना 700 रुपयांऐवजी 2100 रुपये तर 60 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला 1100 रुपयांचे प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात येणार आहे.



यावेळी गुरुद्वारा बोर्डाद्वारे संचालित श्री हजूर साहिब आयटीआयमध्ये नवीन सौर ऊर्जा यंत्रणेचे उद्घाटन करण्यात आले. या प्रकल्पामुळे संस्था ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भर होण्यास मदत होणार आहे. तसेच गुरुद्वारा श्री गोबिंद बाग साहिब येथे पारसेवार कुटुंबाच्या सहकार्याने उभारण्यात आलेल्या ‘ओपन जिम’चे उद्घाटनही करण्यात आले. या जिमचा लाभ स्थानिक नागरिकांसह दूरदूरहून येणाऱ्या भाविकांनाही होणार आहे.


प्रशासक डॉ. विजय सतबीर सिंघ यांनी गुरुद्वारा शिकार घाट साहिब येथे दर्शन घेत सुरू असलेल्या विकासकामांचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी गुरु साहिबांच्या घोड्यांच्या तबेल्यालाही भेट देत घोड्यांच्या आरोग्य, देखभाल आणि खाद्य व्यवस्थेबाबत अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. तसेच वेळोवेळी वैद्यकीय तपासणी करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.


सध्या सुरू असलेल्या तीव्र उष्णतेच्या पार्श्वभूमीवर भाविकांना दिलासा देण्यासाठी गुरुद्वारा साहिबच्या सर्व दर्शनी द्वारांवर थंड पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यासंदर्भात दशमेश रुग्णालयात बैठक घेऊन भाविकांच्या सुविधांचा सूक्ष्म स्तरावर आढावा घेण्यात आला. यावेळी गुरुद्वारा सचखंड बोर्डाचे अधीक्षक स. रविंदर सिंघ कपूर, सहायक अधीक्षक स. जैमल सिंघ ढिल्लों, स. बलविंदर सिंघ फौजी, आयटीआयचे प्राचार्य स. गुरबचन सिंघ सिलेदार, प्रशासकांचे पीए श्रीमती बबिता कौर चाहेल, खालसा हायस्कूलचे प्राचार्य स. चांद सिंघ, सचखंड पब्लिक स्कूलच्या प्राचार्या श्रीमती अनिल कौर तसेच गुरुद्वारा बोर्डाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
