
नांदेड| हुजूर साहिब नांदेड रेल्वे स्थानकाच्या दोन्ही बाजूंच्या प्रवेश व निर्गमन मार्गांजवळ विखुरलेला कचरा आणि अस्वच्छतेबाबत अलीकडे प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तांची रेल्वे प्रशासनाने गांभीर्याने दखल घेतली आहे.



स्थानकाबाहेरील परिसरात साचलेल्या कचऱ्यामुळे प्रवासी आणि स्थानिक नागरिकांनी व्यक्त केलेल्या चिंतेची नोंद घेण्यात आली असून, हुजूर साहिब नांदेड हे शहराचे महत्त्वाचे प्रवेशद्वार तसेच प्रमुख धार्मिक तीर्थक्षेत्र असल्याने परिसराची स्वच्छता आणि चांगली प्रतिमा राखणे अत्यंत आवश्यक असल्याचे रेल्वे प्रशासनाने म्हटले आहे.



ज्या ठिकाणी कचरा साचलेला दिसून येत आहे ती ठिकाणे रेल्वेच्या अधिकारक्षेत्राबाहेर असून संबंधित नागरी प्रशासनाच्या कार्यक्षेत्रात येतात, असे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मात्र प्रवासी व नागरिकांच्या सोयीसाठी संबंधित महानगरपालिका प्रशासनाशी रेल्वे अधिकाऱ्यांचा सातत्याने समन्वय सुरू असून तात्काळ स्वच्छता मोहीम राबविण्याची तसेच नियमित साफसफाई करण्याची विनंती करण्यात आली आहे.


रेल्वे प्रशासनाने स्थानक परिसरातील हॉटेल्स, दुकाने व इतर व्यावसायिक आस्थापनांना परिसरात कचरा टाकणे टाळण्याचे आणि कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्याचे आवाहन केले आहे. प्रभावित ठिकाणे रेल्वे हद्दीबाहेर असल्याने संबंधितांवर रेल्वेकडून दंडात्मक कारवाई करणे शक्य नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.


परिस्थितीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी स्थानिक प्रशासनाशी सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचे सांगण्यात आले असून प्रवासी व नागरिकांनीही स्थानक परिसर आणि आसपास स्वच्छता राखण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
