उन्हाळी गर्दीच्या पार्श्वभूमीवर नांदेड–निजामुद्दीन विशेष रेल्वेची घोषणा

नांदेड| उन्हाळी सुट्ट्यांमुळे वाढलेल्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनाने नांदेड–निजामुद्दीन–नांदेड दरम्यान विशेष रेल्वे चालविण्याचा निर्णय घेतला आहे. ही विशेष रेल्वे आदिलाबाद, पिंपळखुट्टी, नागपूर, राणी कमलापती, बीना, वीरांगना लक्ष्मीबाई झाशी आणि आग्रा कॅन्ट मार्गे धावणार असून दिल्लीकडे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अतिरिक्त सुविधा उपलब्ध होणार आहे.

गाडी क्रमांक 07660 नांदेड–निजामुद्दीन विशेष रेल्वे दिनांक 22 मे 2026 रोजी नांदेड येथून सकाळी 6.35 वाजता सुटेल. ही गाडी आदिलाबाद (10:00), नागपूर (15:55), राणी कमलापती (00:10), वीरांगना लक्ष्मीबाई झाशी (06:00), आग्रा कॅन्ट (10:45) मार्गे दुसऱ्या दिवशी दुपारी 2.30 वाजता निजामुद्दीन येथे पोहोचेल.

तर गाडी क्रमांक 07661 निजामुद्दीन–नांदेड विशेष रेल्वे दिनांक 25 मे 2026 रोजी निजामुद्दीन येथून रात्री 1.25 वाजता सुटेल. ही गाडी आग्रा कॅन्ट (04:30), वीरांगना लक्ष्मीबाई झाशी (09:35), राणी कमलापती (16:20), नागपूर (23:30), आदिलाबाद (05:05) मार्गे दिनांक 26 मे 2026 रोजी सकाळी 9.45 वाजता नांदेड येथे पोहोचेल.

सदर विशेष गाडीत एकूण 22 डबे असतील. त्यामध्ये 18 द्वितीय श्रेणी शय्या (स्लीपर क्लास) डबे, 2 सामान्य डबे आणि 2 एसएलआर डब्यांचा समावेश आहे. प्रवाशांनी या विशेष रेल्वे सेवेचा लाभ घ्यावा तसेच प्रवासापूर्वी अधिकृत रेल्वे चौकशी प्रणालीद्वारे वेळापत्रक आणि आरक्षण स्थिती तपासून घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!