
लोकाभिमुख कामांची समितीकडून पाहणी; विविध योजनांच्या अंमलबजावणीचा घेतला आढावा


हिमायतनगर | मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत हिमायतनगर तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींमध्ये राबविण्यात आलेल्या लोकाभिमुख योजनांचे मूल्यमापन तालुका स्तरीय समितीकडून करण्यात आले. जळगाव जिल्ह्यातील बोदवड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रमेश सपकाळे यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या समितीने ८ मे २०२६ रोजी हिमायतनगर पंचायत समिती अंतर्गत विविध ग्रामपंचायतींना भेट देत विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी केली.


या समितीत सहायक गटविकास अधिकारी अनिलकुमार विसावे (भुसावळ), विस्तार अधिकारी संजोग भारती, केंद्रप्रमुख गोपाल नारायण पाटील, ग्रामपंचायत अधिकारी प्रवीण सपकाळे, सय्यद इकलास तसेच पत्रकार गोपीचंद सुरवाडे यांचा समावेश होता. समितीने बोरगडी, करंजी, सिरंजनी, सरसम पोटा (बु.) आणि टेंभी या ग्रामपंचायतींमधील विकासकामांचे सखोल मूल्यमापन केले. १७ सप्टेंबर ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत राबविण्यात आलेल्या विविध योजनांची अंमलबजावणी, मूलभूत सुविधा आणि ग्रामविकास उपक्रमांचा आढावा घेण्यात आला.


यामध्ये पाणीपुरवठा योजना, वृक्षलागवड, अंगणवाडी, प्राथमिक शाळा, स्मशानभूमी, महिला व पुरुष सार्वजनिक शौचालय, जलसंधारण कामे, रोजगार हमी योजना, महिला बचत गट, लखपती दीदी अभियान, रेन वॉटर हार्वेस्टिंग, सौरऊर्जा, आयुष्मान भारत कार्ड, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान, प्लास्टिक बंदी, घरकुल योजना, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्था, लोकसहभागातून श्रमदान तसेच ग्रामपंचायतींच्या विविध दस्तऐवजांची तपासणी करण्यात आली.


समितीने अनेक ग्रामपंचायतींमध्ये शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. काही योजनांमध्ये आढळलेल्या त्रुटींवर सुधारणा करण्याच्या सूचनाही संबंधित ग्रामपंचायतींना देण्यात आल्या. या पाहणी दौऱ्यादरम्यान हिमायतनगर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी पी. के. नारवटकर, सहाय्यक गटविकास अधिकारी पी. एम. जाधव, विस्तार अधिकारी एस. आर. शिंदे, ग्रामपंचायत अधिकारी ए. पी. सावंत, यु. जे. पठाण, श्री डुडुळे, ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी सेविका, महिला बचत गट प्रतिनिधी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
