
नायगाव येथे ‘महाराजस्व अभियान’ उत्साहात; हजारो नागरिकांनी घेतला विविध योजनांचा लाभ
नांदेड | शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत नायगाव तहसील परिसरात दि. ८ मे रोजी आयोजित करण्यात आलेल्या समाधान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या शिबिरामध्ये विविध शासकीय विभागांच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या तत्काळ सोडविण्यावर भर देण्यात आला. तालुक्यातील सुमारे दोन हजारांहून अधिक नागरिकांनी या अभियानात सहभाग घेत विविध योजनांचा लाभ मिळविला.


कार्यक्रमाच्या प्रारंभी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना शासनाच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी प्रशासनाची असल्याचे सांगितले. सामान्य नागरिकांना शासकीय कार्यालयांच्या वारंवार फेऱ्या माराव्या लागू नयेत, त्यांच्या समस्या एकाच ठिकाणी तत्काळ सोडविल्या जाव्यात, हा या अभियानामागील मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लोकाभिमुख दृष्टीकोन ठेवून नागरिकांच्या अडचणी संवेदनशीलतेने सोडवाव्यात, असे आवाहनही त्यांनी केले.


यावेळी व्यासपीठावर न बसता जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सामान्य नागरिकांमध्ये खुर्ची टाकून बसत संवाद साधला. त्यांच्या या साधेपणाची उपस्थित नागरिकांमध्ये विशेष चर्चा रंगली. तहसीलदार धम्मप्रिया गायकवाड यांनी नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे व प्रक्रिया याबाबत मार्गदर्शन केले. महसूल, पुरवठा, कृषी, आरोग्य, महिला व बालविकास, महावितरण, भूमी अभिलेख आदी विभागांचे स्टॉल्स उभारण्यात आल्याने नागरिकांना विविध सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्या.


या शिबिरात एकूण १२ विभागांचे स्वतंत्र स्टॉल्स उभारण्यात आले होते. संजय गांधी निराधार योजनेंतर्गत प्रलंबित बँक केवायसी पूर्ण करून नवीन अर्ज स्वीकृत करण्यात आले. पुरवठा विभागामार्फत डिजिटल रेशन कार्ड वाटप व दुरुस्तीबाबत माहिती देण्यात आली. महसूल विभागाने जिवंत व डिजिटल सातबाराचे विनामूल्य वितरण केले तसेच रहिवासी, उत्पन्न व जातीच्या प्रमाणपत्रांसाठी अर्ज स्वीकारले. भूमी अभिलेख विभागामार्फत पी.आर. कार्ड, मोजणी प्रक्रिया व जमीन नोंदींबाबत माहिती देण्यात आली. कृषी विभागाने पीएम किसान, महाडीबीटी, महाविस्तारख यांसारख्या योजनांची माहिती देत शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ घेण्याचे आवाहन केले.



आरोग्य विभागाकडून ‘आयुष्मान भारत’ व ‘महात्मा फुले जनआरोग्य योजना’ याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. महावितरण विभागाने ‘मागेल त्याला सोलर’ व ‘प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना’ याबाबत माहिती दिली. महिला व बालविकास विभागामार्फत लेक लाडकी योजना, प्रधानमंत्री मातृवंदना योजना, बेबी केअर किट तसेच गरोदर मातांसाठी पोषण आहार योजनांची माहिती देण्यात आली. या प्रसंगी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा-२ अंतर्गत महिला शेतकरी आशाताई लक्ष्मण कदम (रा. बाबुळगाव) व महानंदा बापुराव तिजारे (रा. पाटोदा) यांना तुषार संचासाठी पूर्वसंमती पत्र प्रदान करण्यात आले.
तसेच ३२ आयुष्मान गोल्डन कार्ड, १० आयुष्मान वयवंदना कार्डांचे वितरण करण्यात आले. ६० लाभार्थ्यांची मधुमेह व उच्च रक्तदाब तपासणी करण्यात आली, तर ३ क्षयरोगी रुग्णांना फूड बास्केटचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमास नायब तहसीलदार विजय येरावाड, नगर पंचायत मुख्याधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधाकर डोईवाड यांनी केले.
