
नांदेड| महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या आदेशान्वये तसेच प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष नरेंद्र के. ब्रह्ये यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवार, दि. 9 मे 2026 रोजी नांदेड जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते.


या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये मोटार अपघात नुकसान भरपाई प्रकरणे, दिवाणी व फौजदारी तडजोड पात्र प्रकरणे, कौटुंबिक वाद, एन.आय. अॅक्ट प्रकरणे, नांदेड वाघाळा महानगरपालिका मालमत्ता कर प्रकरणे, गुन्हा कबुली प्रकरणे, आरटीओ व रेल्वे पोलीस विभागाची प्रकरणे, कामगार न्यायालय, सहकार न्यायालय, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बँक व फायनान्स कंपनी प्रकरणे, पंचायत समिती कर वसुली, बीएसएनएल व एमएसईडीसीएल कंपनीची प्रकरणे आदी विविध प्रकारच्या प्रकरणांचा समावेश करण्यात आला होता. यासाठी जिल्ह्यात एकूण 30 पॅनल तयार करण्यात आले होते.


लोकअदालतीमध्ये न्यायालयातील प्रलंबित 11 हजार 704 प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी 719 प्रकरणे निकाली काढण्यात आली असून त्यांचे तडजोड मूल्य 5 कोटी 33 लाख 88 हजार 823 रुपये इतके आहे. तसेच मालमत्ता थकबाकी, पाणीपट्टी व दाखलपूर्व दावे यातील 961 प्रकरणे निकाली निघाली असून त्यांचे तडजोड मूल्य 2 कोटी 44 लाख 6 हजार 497 रुपये इतके आहे.


अशाप्रकारे एकूण 1680 प्रकरणे निकाली निघाली असून एकूण तडजोड मूल्य 7 कोटी 68 लाख 49 हजार 320 रुपये इतके झाले आहे. विशेष म्हणजे, 30 लाख रुपयांचे एक दिवाणी प्रकरण देखील या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये निकाली काढण्यात आले.


राष्ट्रीय लोकअदालतीच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व पक्षकार, न्यायाधीश व कर्मचारी वर्गाचे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव शरद जी. देशपांडे यांनी आभार मानले.
