
आजोबा-नातवाचा जागीच मृत्यू, एक गंभीर
हिमायतनगर | भोकर-हिमायतनगर महामार्गावरील पोटा आबादी परिसरात उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची जोरदार धडक बसून झालेल्या भीषण अपघातात आजोबा व नातवाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी दुपारी घडली. या अपघातात आणखी एक सहा वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर नांदेड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, हिमायतनगर तालुक्यातील जवळगाव येथील रहिवासी बालाजी गंगाराम नाचारे (वय 50), त्यांचा नातू आरूष रतन नाचारे आणि अक्षय माधव शेळके (वय 6) हे तिघेजण दुचाकीवरून प्रवास करत होते. दरम्यान, पोटा आबादीजवळील मनीषा आश्रम शाळेसमोर रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला त्यांच्या दुचाकीची जोरदार धडक बसली.



या भीषण अपघातात बालाजी नाचारे व त्यांचा नातू आरूष नाचारे यांचा जागीच मृत्यू झाला, तर अक्षय माधव शेळके हा गंभीर जखमी झाला. जखमी अक्षयला प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी नांदेड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. दरम्यान, मृत बालाजी नाचारे यांचे शवविच्छेदन हिमायतनगर उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आले. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला असून जवळगाव येथे सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.



या घटनेनंतर महामार्गावर बेदरकारपणे उभी केली जाणारी मोठी वाहने अपघातांना कारणीभूत ठरत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. भोकर-हिमायतनगर महामार्गालगतच्या गावांमध्ये गतीरोधक बसविण्याची मागणी वारंवार करण्यात येत असतानाही सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करीत असल्याचा संताप व्यक्त होत आहे.



पोटा, सरसम व परिसरात महिन्याला अनेक अपघातांच्या घटना घडत असून भरधाव वेगाने धावणारे ट्रक, हायवा आणि जीप यामुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.
