
जीवितहानीची वाट पाहताय का?


हिमायतनगर | तालुक्यातील मौजे मंगरूळ गावातील विद्युत समस्यांकडे महावितरण प्रशासन सातत्याने दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत असून, एखाद्याचा जीव गेल्यानंतरच उपाययोजना केली जाणार का? असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.


मंगरूळ येथील रहिवासी गंगाधर पुंजाराम पांडलवाड यांनी उपकार्यकारी अभियंता, महावितरण उपविभागीय कार्यालय हिमायतनगर यांच्याकडे विविध विद्युत कामांसंदर्भात वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याचा आरोप केला आहे.


पांडलवाड यांनी दिलेल्या निवेदनानुसार, ऑक्टोबर 2025 पासून संबंधित कामांसाठी ते सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. मात्र, आजपर्यंत कोणताही अधिकारी अथवा कर्मचारी या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. याबाबत 16 एप्रिल रोजी संबंधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनासही बाब आणून दिली होती, तरीदेखील परिस्थितीत कोणताही बदल झालेला नसल्याचा आरोप त्यांनी केला.


दरम्यान, मे महिन्यानंतर शेतकरी शेती मशागतीच्या कामात व्यस्त होणार असल्याने त्यापूर्वीच आवश्यक विद्युत कामे पूर्ण करण्यात यावीत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. वेळेत उपाययोजना न झाल्यास भविष्यात गंभीर अपघात होण्याची भीतीही नागरिकांनी व्यक्त केली आहे.
महावितरणच्या ढिसाळ कारभारामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण असून, संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने दखल घेऊन प्रश्न मार्गी लावावेत, अशी मागणी मंगरूळ ग्रामस्थांकडून होत आहे.
