“३५% चा विजय” एका मुलीच्या आयुष्याला मिळालेलं नवं वळण

कधी कधी काही बातम्या आकड्यांमध्ये मोजता येत नाहीत… त्या मनात घर करून जातात… अशीच एक प्रेरणादायी घटना नांदेड जिल्ह्यात समोर आली आहे.

“साहेब… माझी मुलगी पास झाली हो… तिला ३५% पडले…” फोनवरील त्या वडिलांचा थरथरता पण आनंदाने भरलेला आवाज आजही मनाला स्पर्श करून जातो. कारण हे फक्त ३५ टक्के नव्हते… तर एका मुलीच्या नव्या आयुष्याची सुरुवात होती.

शिवसांब घोडके हे नांदेड वनविभागात वनरक्षक म्हणून कार्यरत असताना कंधार तालुक्यातील एका गावात बिबट्याच्या अफवेच्या शोधमोहीमेवर गेले होते. तेव्हा त्यांच्या नजरेस एक दहावीतील मुलगी उन्हात शेतात काम करताना दिसली. अभ्यासात मागे पडल्याने आणि मुलांच्या चेष्टेमुळे तिने शाळा सोडली होती. त्या दिवशी भोकराच्या झाडाखाली झालेला संवाद एका मुलीच्या आयुष्याला नवं वळण देणारा ठरला.

“तू शाळेत जा… शिक्षणच तुझं आयुष्य बदलू शकतं…” या शब्दांनी त्या मुलीच्या मनात नवी आशा निर्माण झाली. वडिलांनीही मुलीला पुन्हा शाळेत पाठवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर नियमित शाळा, अभ्यास आणि जिद्दीच्या जोरावर त्या मुलीने दहावीची परीक्षा उत्तीर्ण केली. गुण फक्त ३५% असले तरी तिच्यासाठी तो आत्मविश्वासाचा आणि संघर्षावर मिळवलेल्या विजयाचा क्षण होता.

आजही ग्रामीण भागात अनेक मुली शिक्षणापासून दूर आहेत. परिस्थिती, गरिबी, चेष्टा आणि जबाबदाऱ्या त्यांची स्वप्नं हिरावून घेतात. पण योग्य वेळी मिळालेली प्रेरणा आणि विश्वास एखाद्याचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतो, हे या घटनेने दाखवून दिले.

ही कथा प्रत्येक शाळाबाह्य मुलीपर्यंत पोहोचण्याची गरज आहे… कारण प्रत्येक मुलगी स्वतःचं भविष्य घडवू शकते. फक्त तिला आधार, प्रेरणा आणि विश्वासाची गरज असते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!