100 दिवस कृती आराखड्यांतर्गत नांदेड मनपाकडून पावसाळापूर्व नालेसफाईला वेग

नांदेड| नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेच्या सेवा-सुविधांमध्ये संख्यात्मक व गुणात्मक सुधारणा करण्याच्या उद्देशाने महापौर सौ. कविता मुळे, उपमहापौर दिपकसिंह रावत आणि सभागृह नेते ॲड. महेश कानकदंडे यांच्या अध्यक्षतेखाली ‘100 दिवस कृती आराखडा’ उपक्रम राबविण्यात येत आहे.

या उपक्रमाअंतर्गत आपत्ती सौम्यीकरणासाठी स्वच्छता विभागामार्फत पावसाळापूर्व तयारीला वेग देण्यात आला असून, शहरातील छोटे व मोठे नाले जेसीबी व पोकलेन मशिनच्या सहाय्याने साफ करण्यात येत आहेत.

आयुक्त महेशकुमार डोईफोडे, उपआयुक्त नितीन गाढवे (स्वच्छता) आणि सहाय्यक आयुक्त गुलाम सादिक यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक 02, 05, 08, 09, 13, 17 व 20 मधील पावसाळ्यात पाणी साचणारे व वाहणारे नाले स्वच्छ करण्याचे काम सुरू आहे.

मागील दोन आठवड्यांपासून कच्चे व पक्के नाले यांची व्यापक स्वरूपात साफसफाई केली जात असून, संबंधित अधिकाऱ्यांकडून वेळोवेळी स्थळभेट देऊन कामाची पाहणी केली जात आहे.
या उपक्रमामुळे अतिवृष्टीच्या काळात पावसाचे पाणी सुरळीत वाहून जाण्यास मदत होणार असून, सखल भागात पाणी साचण्याच्या समस्या कमी होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

याशिवाय संबंधित प्रभागांमध्ये रस्त्यांचे डीप क्लिनिंग, घरोघरी विलगीकृत कचरा संकलन तसेच स्वच्छतेबाबत जनजागृती अभियानही राबविण्यात येत आहे. नागरिकांनीही आपल्या परिसरात कचरा किंवा पावसाचे पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन मनपाकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!