जिल्हा परिषदेत विकासकामांचा आढावा; खा. अशोकराव चव्हाण व आ. श्रीजया चव्हाण यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

नांदेड| माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण आणि भोकर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्रीजया चव्हाण यांनी जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली व वरिष्ठ अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेत विविध विकासकामांची सविस्तर माहिती जाणून घेतली.

या बैठकीत जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या केंद्र व राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला. जलजीवन मिशन, वॉटर ग्रीड योजना, रस्ते विकास, पाणंद रस्ते, शिक्षण, सार्वजनिक आरोग्य सुविधा तसेच रोजगार हमी योजनेतील कामांवर विशेष चर्चा करण्यात आली.

खा. अशोकराव चव्हाण व आ. श्रीजया चव्हाण यांनी विविध विकासकामांची सद्यस्थिती, प्रगती आणि त्यामधील अडचणी जाणून घेत संबंधित अधिकाऱ्यांना प्रलंबित कामे विहित मुदतीत व गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.

या बैठकीस अर्धापूर भाजपा तालुकाध्यक्ष बालाजी गव्हाणे, भोकर तालुकाध्यक्ष दिवाकर रेड्डी, मुदखेड तालुकाध्यक्ष दत्तू देशमुख वाडीकर यांच्यासह जिल्हा परिषदेच्या विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!