
नांदेड| हुजूर साहेब नांदेड रेल्वे स्थानकावरील वाढती प्रवासी संख्या आणि भविष्यातील गरजा लक्षात घेता, स्थानकातील तीन ‘पिट लाईन’ मालटेकडी रेल्वे स्थानकावर स्थलांतरित करण्याच्या प्रस्तावाला रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती समोर आली आहे. खा. अशोकराव चव्हाण यांनी नवी दिल्ली येथे रेल्वेमंत्र्यांची भेट घेऊन यासंदर्भात सविस्तर चर्चा केली.


सध्या नांदेड स्थानकाच्या मुख्य आवारात असलेल्या पिट लाईनवर रेल्वे गाड्यांची स्वच्छता, दुरुस्ती आणि तांत्रिक तपासणी केली जाते. या लाईनवर गाड्या अनेक तास उभ्या राहत असल्याने प्लॅटफॉर्म विस्तारासाठी अडचणी निर्माण होत आहेत. या तिन्ही पिट लाईन मालटेकडी येथे हलवल्यास नांदेड स्थानकावर अतिरिक्त प्लॅटफॉर्मसाठी मोठी जागा उपलब्ध होणार आहे.


भविष्यात ‘वंदे भारत’सारख्या अत्याधुनिक रेल्वे सेवांसाठी आवश्यक सुविधा उभारणे, तसेच पुढील २० ते ३० वर्षांचा रेल्वे विकास आराखडा लक्षात घेता हा निर्णय महत्त्वाचा ठरणार असल्याचे खा. अशोकराव चव्हाण यांनी रेल्वेमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.


नांदेड-लातूर नवीन रेल्वे मार्गालाही गती?


या बैठकीत नांदेड-लातूर नवीन रेल्वे मार्गाच्या प्रस्तावावरही सकारात्मक चर्चा झाल्याचे समजते. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी खा. अशोकराव चव्हाण यांनी सातत्याने पाठपुरावा केला असून, लवकरच या रेल्वे मार्गाबाबत अधिकृत निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
