
कंधार (सचिन मोरे) कंधार तालुक्यातील पेठवडज सह काही गावांमध्ये झालेल्या गारपीटीमध्ये फळबागेचे प्रचंड नुकसान झाले असून अनेक गावांमध्ये वादळी वाऱ्याने थैमान घालत अवकाळी पावसाने शेतकरी वर्गाचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती ग्रामस्थांकडून ऐकावस मिळत आहे. अचानक झालेल्या गारपिटीमुळे सर्वसामान्य जनतेची एकच धांदल उडाली.



याबाबत सविस्तर माहिती अशी की, ७ मे गुरुवार रोजी दुपारच्या सुमारास अचानक हवामानामध्ये बदल होत थंड वारे सुरू झाली. वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. दुपारी एक ते दीड च्या दरम्यान पेठवडजसह गोणार, शिरशी बुद्रुक, शिरशी खुर्द, कलाळी, मंगनाळी, या गावासह अनेक गावांमध्ये वीस ते पंचवीस मिनिटे गारपीट होऊन शेतकरी वर्गाचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे वृत्त आहे.



अचानक झालेल्या वादळी वाऱ्यामुळे परिसरातील आंबा, चिकू, टरबूज या फळ पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून अनेक ठिकाणी वृक्ष पडल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे. तर काही ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला आहे.


गारपिटीमळे शेतीतील उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून विशेषतः भाजीपाला पिके, मका, ज्वारी तसेच फळबागांना फटका बसला आहे. त्याचबरोबर आंबा, डाळिंब, जांभूळ चिकूसह व इतर फळझाडांवरील फळे गारांच्या तडाख्याने खाली पडल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.


या प्रचंड अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली असून आधीच वाढते उत्पादन खर्च आणि बाजारभावातील अनिश्चितता यामुळे बळीराजा अडचणीत सापडला आहे.
शेतकऱ्यांसमोर आता नवीन संकट उभे ठाकले आहे. ऐन लगन सराईच्या काळामध्ये झालेली गारपीट शेतकऱ्यासह सर्वसामान्य जनतेस कोणत्या कडेला नेऊन लावेल याबद्दल सर्वसामान्य जनता तीव्र संताप व्यक्त करीत आहे.

तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्याला आर्थिक मदत द्या
अचानक झालेल्या गारपिटीमुळे बळीराजासमोर आता नवीन संकट उभे टाकले असून बाधित शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करून त्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी अनेक राजकीय नेते व सामाजिक संघटनांनी तहसीलदार कंधार यांच्याकडे केली आहे.
