
नांदेड| वाहतूक नियमांचे पालन करणाऱ्या नागरिकांचा सन्मान करत नांदेडमध्ये रस्ते सुरक्षा जनजागृतीचा प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला. वाहतूक पोलीस, परिवहन विभाग आणि ‘सेफर इंडियन रोड्स’ यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा ज्योतिबा फुले पुतळा परिसर, आयटीआय चौक येथे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.


यावेळी हेल्मेट व सीट बेल्टचा वापर करणाऱ्या वाहनचालकांना जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते ‘सरप्राईज गिफ्ट्स’ देऊन गौरविण्यात आले. तसेच रस्ते चिन्हांचा माहिती तक्ताही नागरिकांना वितरित करण्यात आला. या उपक्रमामुळे वाहतूक नियमांचे पालन करणाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.


कार्यक्रमाला अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रशांत कंकरेज, वाहतूक पोलीस निरीक्षक भागवत नागरगोजे यांची प्रमुख उपस्थिती होती.



यावेळी बोलताना जिल्हाधिकारी राहुल कर्डिले म्हणाले की, “रस्ते सुरक्षा ही केवळ प्रशासनाची नाही तर प्रत्येक नागरिकाची सामायिक जबाबदारी आहे. वाहतुकीचे नियम, रस्ते चिन्हे आणि इतर रस्ता वापरकर्त्यांचा आदर केल्यास अपघातांचे प्रमाण निश्चितच कमी होईल.”



वाढती वाहनसंख्या आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेता, रस्ते अपघात रोखण्यासाठी प्रत्येकाने जबाबदारीने वाहन चालवावे, असे आवाहनही त्यांनी केले.

या कार्यक्रमात संतोष तिडके, शिवकांथा जयलवाल, घनश्याम ओझा, परीक्षित ओझा, महेश तिवारी, भास्कर थेटे, सोनू उपाध्याय, तरुण तिवारी, विवेक तिवारी, वरुण तिवारी तसेच महिला व युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

