नांदेड ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई; ४३.४८ लाखांचा अवैध शस्त्रसाठा जप्त

नांदेड| ऑपरेशन “क्रॅक डाऊन” अंतर्गत कॉम्बिंग ऑपरेशन दरम्यान नांदेड ग्रामीण पोलिसांनी अवैध शस्त्रसाठ्यावर धडक कारवाई करत तब्बल ४३ लाख ४८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात अवैध व्यवसायांविरोधात विशेष मोहीम सुरू आहे. त्यानुसार दिनांक ६ मे रोजी रात्री ११.१५ वाजल्यापासून ७ मे रोजी पहाटे ५ वाजेपर्यंत बळीरामपूर व गुरूरामदास नगर परिसरात कॉम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले.

कारवाईदरम्यान पोलिसांना बळीरामपूर येथे एक संशयित इसम कमरेला तलवार व खंजर बाळगून आढळला. त्यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने आपले नाव अभिजीत गिरीधर सातपुते, रा. बळीरामपूर असे सांगितले. तसेच ही शस्त्रे गुरू रामदास नगर येथून विकत घेतल्याची माहिती दिली.

यानंतर पोलिसांनी गुरू रामदास नगर येथे छापा टाकला असता एक संशयित इसम घटना- स्थळावरून पसार झाला. पोलिसांनी पंचासमक्ष खोलीची झडती घेतली असता मोठ्या प्रमाणात तलवारी, गुप्त्या, खंजिर, कुकरी, नकल खंजर व इतर घातक साहित्य असा एकूण ४७९६ अवैध शस्त्रसाठा आढळून आला. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची किंमत ४३ लाख ४८ हजार रुपये इतकी आहे. चौकशीत हा शस्त्रसाठा जसवंतसिंग प्रकाशसिंग सुखमणी, रा. अबचलनगर, नांदेड याचा असल्याची माहिती समोर आली.

या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५१०/२०२६ अन्वये शस्त्र अधिनियम कलम ४/२५ व ७/२५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर, पोउपनि व्यंकट कुसमे, ज्ञानेश्वर मटवाड तसेच नांदेड ग्रामीण पोलिसांच्या पथकाने केली. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी पथकाचे कौतुक केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!