जुगार अड्ड्यावर छापा; पाच जण जेरबंद, १.४२ लाखांचा मुद्देमाल जप्त

नांदेड (प्रतिनिधी) नांदेड ग्रामीण पोलिसांनी “ऑपरेशन क्रॅकडाऊन” अंतर्गत मोठी कारवाई करत जुगाराच्या अड्ड्यावर छापा मारून पाच आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत रोख रक्कम, मोबाईल, मोटारसायकल व जुगार साहित्य असा एकूण १ लाख ४२ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम १८८७ अंतर्गत कलम १२ (अ) प्रमाणे गुन्हा क्रमांक ५०७/२०२६ दाखल करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील (भोकर), अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, ५ मे रोजी सायंकाळी लिमरा हिल्स कॉलनी परिसरात, बंधारा ब्रिजजवळ काही जण जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक ओमकांत चिचोलकर यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी सापळा रचून छापा टाकला.

या कारवाईत पाच आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, सर्व आरोपी नांदेड शहरातील विविध भागातील रहिवासी असून मजुरी व्यवसाय करतात. पोलिसांनी आरोपींकडून ५२ बदाम छाप पत्ते, जुगार साहित्य, ५ हजार ३०० रुपये रोख रक्कम, एक मोटारसायकल व पाच मोबाईल फोन असा एकूण १,४२,३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

या कारवाईत व्यंकट कुसमे, वसंत केंद्रे, विनोद पवार, मारोती पंचलिंग, शंकर माळगे, समीर अहमद, सचिन चावरे, धम्मपाल कांबळे आदी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
दरम्यान, उल्लेखनीय कारवाईबद्दल पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी संबंधित पथकाचे कौतुक करून अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!