एल-निनोच्या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यात विशेष चारा सुरक्षा आराखडा

नांदेड| यंदाच्या मान्सूनवर ‘एल-निनो’चा परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेता संभाव्य चारा टंचाई टाळण्यासाठी नांदेड जिल्हा प्रशासन आणि पशुसंवर्धन विभाग सतर्क झाले आहेत. जिल्ह्यातील पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी विशेष जिल्हा चारा सुरक्षा आराखडा तयार करण्यात येत आहे.

पालकमंत्री अतुल सावे, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या निर्देशानुसार हा आराखडा राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील पशुधनासाठी पुरेसा चारा उपलब्ध राहावा यासाठी विविध उपाययोजनांचे नियोजन करण्यात आले आहे.

धरणांच्या गाळपेरा क्षेत्रात तसेच नदीकाठच्या जमिनींवर विशेष चारा लागवड मोहीम राबविण्यात येणार आहे. टंचाईच्या काळात चाऱ्याची उपलब्धता कायम राहावी यासाठी मुरघास प्रकल्पांना गती देण्यात येणार असून, चारा साठवणुकीवरही भर दिला जाणार आहे.

पशुपालकांसाठी चारा साक्षरता अभियान राबवून कडबा कुट्टी यंत्राचा वापर, चाऱ्याची बचत आणि योग्य व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच विदर्भ-मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्पांतर्गत पशुपालकांना १०० टक्के अनुदानावर सुधारित वैरण बियाणे उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

जिल्हा नियोजन व विकास समितीमार्फत पहिल्या टप्प्यात १ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून, महाबीज मार्फत चारा बियाणे खरेदीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!