
नांदेड (प्रतिनिधी) नांदेड जिल्ह्यात सुरू असलेल्या “ऑपरेशन क्रॅकडाऊन” मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत एका विधीसंघर्षग्रस्त बालकाच्या ताब्यातून गावठी कट्टा (अग्नीशस्त्र) व दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. जप्त मुद्देमालाची किंमत सुमारे २७ हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.


ही कारवाई पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील (भोकर) व अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांच्या आदेशानुसार सहायक पोलीस निरीक्षक रवि वाहुळे व त्यांच्या पथकाने ही धडक कारवाई केली.


मिळालेल्या माहितीनुसार, ६ मे रोजी पेट्रोलिंग दरम्यान पोलिसांना इतवारा परिसरातील पहेलवान टी हाऊस जवळ एक इसम गावठी कट्टा विक्रीसाठी घेऊन आल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून छापा टाकला असता एक विधीसंघर्षग्रस्त बालक संशयास्पद अवस्थेत आढळून आला. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून एक लोखंडी गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसे असा एकूण २७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.


चौकशीदरम्यान संबंधित बालकाने हा कट्टा व काडतुसे बिहार राज्यातील पटणा जिल्ह्यातील मधुवन्नी येथील “सत्या” नावाच्या व्यक्तीकडून खरेदी केल्याची माहिती दिली असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी इतवारा पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्यानुसार कलम ३/२५ व ७/२५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.


या कारवाईत पोउपनि बळीराम दासरे, माधव केंद्रे, सपोउपनि गुंडेराव करले, पोहेका मिलींद नरबाग, पोकॉ मोतीराम पवार, चापोहेका सिद्धार्थ सोनसळे आदींनी सहभाग घेतला. दरम्यान, उल्लेखनीय कारवाईबद्दल पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे.
