ऑपरेशन ‘क्रॅकडाऊन’ अंतर्गत मोठी कारवाई; १५.९८ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त

नांदेड (प्रतिनिधी) नांदेड स्थानिक गुन्हे शाखेने “ऑपरेशन क्रॅकडाऊन” अंतर्गत मोठी कारवाई करत प्रतिबंधित गुटखा, पानमसाला व सुगंधीत जर्दा असा तब्बल १५ लाख ९८ हजार ४२९ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी दोन जणांविरुद्ध इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील (भोकर) व अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक महेश कोरे व त्यांच्या पथकाने ही धडक मोहीम राबवली.

मिळालेल्या माहितीनुसार, ५ मे रोजी स्थानिक गुन्हे शाखेला नांदेड शहरातील चुनाभट्टी परिसरात एका घरात मोठ्या प्रमाणात गुटखा साठवून ठेवण्यात आल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी चुनाभट्टी येथील पोल्ट्रीफॉर्म मागील घरावर छापा टाकला.

या कारवाईत आरोपी मोहमद सुफियान मोहमद शवीर (वय २४, रा. रहेमतनगर, देगलूर नाका, नांदेड) याच्या ताब्यातून महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा, सुगंधीत पानमसाला, जर्दा व तंबाखू असा एकूण १५,९८,४२९ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

चौकशीदरम्यान हा माल सय्यद सज्जाद अली पि. सय्यद समशाद अली, रा. चुनाभट्टी, देगलूर नाका, नांदेड यांचा असल्याचे समोर आले. त्यानंतर दोन्ही आरोपींविरुद्ध इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १४४/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता कलम १२३, २७४, २७५ तसेच अन्न सुरक्षा मानके अधिनियमांतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कारवाईत पोहेकॉ मोहन हाके, पोकॉ संघरत्न गायकवाड, श्रीराम दासरे, माधव माने, मनोज राठोड आदी कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. दरम्यान, या उल्लेखनीय कारवाईबद्दल पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!