अबचल नगरमध्ये हाय व्होल्टेजचा फटका; घरगुती उपकरणे जळून खाक

 नागरिकांचा महावितरणविरोधात संताप
नांदेड (प्रतिनिधी) शहरातील अबचल नगर परिसरात उच्च दाबाच्या (हाय व्होल्टेज) विद्युत पुरवठ्यामुळे अनेक घरांतील महागडी विद्युत उपकरणे जळून खाक झाल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे संतप्त नागरिकांनी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी (महावितरण)कडे धाव घेत तातडीने पंचनामा करून नुकसानभरपाई देण्याची जोरदार मागणी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दि. ४ मे रोजी रात्री सुमारे ८ वाजता सेक्टर क्रमांक १, अबचल नगर परिसरात अचानक विद्युत दाब प्रचंड वाढला. या तांत्रिक बिघाडामुळे फ्रीज, टीव्ही, एअर कंडिशनर, पंखे, बल्ब यांसारखी अनेक घरगुती उपकरणे एका क्षणात निकामी झाली. या घटनेमुळे नागरिकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.

घटनेनंतरही परिसरात व्होल्टेजचे चढ-उतार सुरूच असल्याने उर्वरित उपकरणांनाही धोका निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, या प्रकाराची माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांना वारंवार देऊनही अद्याप कोणताही अधिकारी घटनास्थळी दाखल झाला नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. यामुळे संताप अधिकच वाढला आहे.

ऐन उन्हाळ्यात वीजपुरवठा विस्कळीत होणे आणि उपकरणांचे नुकसान झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर सेक्टर १ मधील रहिवाशांच्या वतीने दीपक सिंग रतन सिंग गल्लीवाले यांनी महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन सादर केले आहे.

निवेदनात तात्काळ घटनास्थळी भेट देऊन नुकसानीचा पंचनामा करणे, तांत्रिक बिघाड दूर करून व्होल्टेज स्थिर करणे तसेच बाधित ग्राहकांना नियमानुसार नुकसानभरपाई देण्याच्या प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत. दरम्यान, या गंभीर प्रकरणात महावितरणने तातडीने हस्तक्षेप करून ठोस कारवाई करावी, अन्यथा आंदोलनाचा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!