हिमायतनगर येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’चे आयोजन

नागरिकांना एकाच ठिकाणी शासकीय सेवांचा लाभ

हिमायतनगर (उत्कर्ष मादसवार) तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना विविध महसुली व शासकीय सेवा सुलभपणे उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने तहसील कार्यालय हिमायतनगर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ आयोजित करण्यात आले आहे. नागरिकांच्या विविध अडचणी एकाच ठिकाणी सोडविण्यासाठी हे विशेष अभियान राबविण्यात येत आहे. हे शिबिर शुक्रवार, दि. ८ मे रोजी सकाळी ९.०० वाजता शहरातील हुतात्मा जयवंतराव पाटील कन्या शाळा व उच्च माध्यमिक महाविद्यालय येथे पार पडणार आहे.

या शिबिरात महसूल विभागाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. प्रलंबित फेरफार प्रकरणे, ७/१२ व ८-अ उताऱ्यांचे वितरण (डिजिटल स्वाक्षरीसह), उत्पन्न, जात, रहिवासी व नॉन-क्रिमीलेअर प्रमाणपत्र, जमीन अभिलेख अद्ययावत करणे, ई-मोजणी अर्ज, तसेच अकृषक (एनए) तरतुदींविषयी मार्गदर्शन केले जाणार आहे.

याशिवाय तुकडेबंदी कायद्यांतर्गत प्रकरणांचा निपटारा, भूसंपादन व अकृषिक परवानगी संदर्भातील माहिती, घरकुलासाठी पट्टे वाटप, पीएम किसान व अॅग्रीस्टॅक नोंदणीसारख्या सुविधा देखील उपलब्ध असतील. शिबिरात महसूल विभागासोबत ग्रामपंचायत, पंचायत समिती, आरोग्य, कृषी, समाजकल्याण, दुय्यम निबंधक, भूमिलेख, महिला व वन विभाग, पोलीस विभाग यांसह विविध विभागांचे स्टॉल उभारले जाणार आहेत.

नागरिकांच्या आरोग्याचीही काळजी घेत रक्तगट तपासणी, बीपी, शुगर व ईसीजी तपासणी या सेवा मोफत दिल्या जाणार आहेत. तसेच एस.टी. महामंडळाच्या सवलत कार्डचे वाटप व शेतकरी संवाद कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले आहे. शिबिराचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी आवश्यक अर्ज शिबिरापूर्वी ग्रामपंचायत अधिकारी किंवा मंडळ अधिकाऱ्यांकडे सादर करावेत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

विद्यार्थ्यांसाठी जात, उत्पन्न, रहिवासी प्रमाणपत्र तसेच शैक्षणिक कामांसाठी आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून देण्यात येणार असल्याने विद्यार्थी व पालकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन तहसीलदार पल्लवी टेमकर व मंडळाधिकारी बी. एम. चव्हाण यांनी केले आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना एकाच ठिकाणी विविध शासकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी हे शिबिर अत्यंत उपयुक्त ठरणार असून, प्रलंबित कामांचा जलद निपटारा करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे सांगण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!