नांदेडमध्ये ‘व्हाईट एप्रन’ वरून नवा वाद; सार्वजनिक ठिकाणी वापरास बंदीची मागणी

नांदेड (प्रतिनिधी) रुग्णालयातील डॉक्टर, नर्सिंग स्टाफ व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांनी ड्युटीवर येताना-जाता किंवा ड्युटीनंतर व्हाईट एप्रन अथवा हॉस्पिटल युनिफॉर्म घालून सार्वजनिक ठिकाणी फिरू नये, अशी मागणी पुढे आली असून यामुळे नांदेडमध्ये नव्या वादाला तोंड फुटले आहे.

यासंदर्भात जिल्हाधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक तसेच महानगरपालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले आहे. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, रुग्णालयात वापरला जाणारा व्हाईट एप्रन बाहेर वापरल्यास संसर्ग नियंत्रणावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

यामुळे संसर्ग पसरू शकतो तसेच डॉक्टर व नर्सिंग व्यवसायाच्या व्यावसायिक प्रतिमेलाही धक्का बसू शकतो, अशी भूमिका मांडण्यात आली आहे. देशातील काही राज्ये तसेच अनेक रुग्णालयांनी याबाबत मार्गदर्शक सूचना लागू केल्याचा दाखला देत, नांदेड जिल्ह्यातील सर्व शासकीय व खासगी रुग्णालयांमध्येही स्पष्ट नियमावली लागू करण्याची मागणी करण्यात आली आहे.

निवेदनात हॉस्पिटलमध्ये स्वतंत्र चेंजिंग रूम, लॉकर व्यवस्था, हायजिन प्रोटोकॉल कडक करणे तसेच ड्युटीबाहेर एप्रन वापरास बंदी घालणे यांसारख्या मागण्या करण्यात आल्या आहेत. या मुद्द्यामुळे आरोग्य विभागात चर्चेला उधाण आले असून याबाबत प्रशासन काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हे निवेदन युनायटेड नर्सेस असोसिएशनचे आदीभाऊ बनसोडे यांनी सादर केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!