हिमायतनगरात डिझेल तुटवड्यात गैरप्रकार? कॅनमधून विक्रीवर नागरिकांचा आक्षेप

हिमायतनगर (प्रतिनिधी) शहरातील पेट्रोल पंपांवर सध्या पेट्रोल-डिझेलचा तुटवडा जाणवत असताना, काही ठिकाणी नियम धाब्यावर बसवून कॅनमध्ये डिझेल भरून दिले जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे वाहनधारकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या असतानाही काही ग्राहकांना जादा दर घेऊन दोन-दोन कॅनमध्ये डिझेल दिले जात असल्याचा आरोप आहे. पंपावरील कर्मचाऱ्यांना याबाबत विचारणा केली असता “पंप स्लो चालू आहे” असे कारण दिले जात असल्याचे वाहनधारकांचे म्हणणे आहे.

दरम्यान, सध्या शेतीचा हंगाम सुरू असल्याने ट्रॅक्टर चालक व शेतकऱ्यांना डिझेलची मोठ्या प्रमाणात गरज आहे. मात्र, शेतीच्या नावाखाली डिझेलचा साठा करून त्याची अवैध विक्री होत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.

वाहनधारकांनी पंप प्रशासनाकडे मागणी केली आहे की, सर्वप्रथम रांगेत उभ्या असलेल्या वाहनांना प्राधान्य देऊन इंधन द्यावे. तसेच शेतकऱ्यांना त्यांच्या गरजेनुसार पारदर्शक पद्धतीने डिझेल उपलब्ध करून द्यावे आणि कॅनमधील विक्रीवर नियंत्रण ठेवावे. एकूणच, वाढत्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर इंधन वितरणात पारदर्शकता व नियोजन आवश्यक असून, प्रशासनाने तातडीने कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!