
हिमायतनगर (अनिल मादसवार) शहरातील वार्ड क्रमांक ६ येथे महावितरणच्या वीज पुरवठा करणाऱ्या डीपीला शॉर्ट सर्किट होऊन आग लागल्याची घटना दिनांक ४ रोजी सायंकाळी घडली. ही घटना घडताच परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.


या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते संतोष मुदेवाड व महेश गायकवाड यांनी सांगितले की, आग लागल्यानंतर सुमारे अर्धा तास महावितरणचे कोणतेही कर्मचारी घटनास्थळी पोहोचले नाहीत. तसेच वीजपुरवठा तात्काळ बंद न केल्यामुळे आग अधिक भडकली.


घटनेनंतर उशिरा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आणि संबंधित डीपीचे मेंटेनन्स करण्यात आले. त्यानंतर रात्री सुमारे १०.३० वाजता वीजपुरवठा पुन्हा सुरू करण्यात आला. या घटनेमुळे शहरातील वीजपुरवठा तब्बल ५ ते ६ तास खंडित राहिला.


वार्ड क्रमांक ६ मधील वस्तीत डीपीला आग लागल्याची माहिती मिळताच नागरिकांनी खबरदारी म्हणून घराबाहेर पडून सुरक्षित ठिकाणी आसरा घेतला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा मोठी दुर्घटना घडली नाही, त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.


दरम्यान, सध्या परिसरात तापमान ४१ अंश सेल्सिअसच्या वर गेल्यामुळे उष्णतेची तीव्र लाट आहे. या वाढत्या तापमानामुळे वीज डीपीमध्ये शॉर्ट सर्किट होण्याच्या घटना वाढत असल्याचे बोलले जात आहे. अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी महावितरण विभागाने ठोस व तातडीच्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
हिमायतनगर शहर व परिसरात गेल्या महिन्याभरापासून खंडित वीज पुरवठ्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना करावा लागत आहे. अचानकपणे वीज पुरवठा खंडित होत असल्यामुळे अगोदरच उकाड्याने हैराण झालेले नागरिक खंडित वीज पुरवठ्यामुळे त्रस्त झाले आहेत. जशी महावितरण कंपनी विजबिल वसुली करण्यात स्पर्धा दाखवते त्याच पद्धतीने वीज पुरवठा करण्यासाठी तत्परता दाखवावी अशी मागणी वीज ग्राहक वर्गातून केली जात आहे.
