
नांदेड (प्रतिनिधी) विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश करत दोन आरोपींना अटक केली असून एक आरोपी फरार आहे. आरोपींकडून सुमारे ५ लाख ४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.


या प्रकरणी गुन्हा क्रमांक १७१/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५(अ), ३३१(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक मिलींद सोनकांबळे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.


पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील (भोकर) व अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.


अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे शेख नईम शेख महेबुब (वय २२, रा. माळटेकडी, म्हाळजा, नांदेड) व शेख रहेमान उर्फ भेंडी शेख अशपाक (वय १९, रा. मखदुम नगर, नई आबादी, नांदेड) अशी आहेत. तर शेख गोस शेख माजिद (रा. जामा मस्जिद जवळ, कामठा, नांदेड) हा आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी नावघाट परिसरातील स्मशानभूमीजवळ सापळा रचून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांनी साथीदारासह घरफोडी केल्याची कबुली दिली.


आरोपींकडून अंदाजे ३० ग्रॅम सोन्याचे दागिने (किंमत सुमारे ४.५६ लाख रुपये) व २०० ग्रॅम चांदीचे दागिने (किंमत सुमारे ४८ हजार रुपये) असा एकूण ५.०४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर आरोपींना पुढील तपासासाठी विमानतळ पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून, फरार आरोपीचा शोध सुरू आहे. या यशस्वी कारवाईबद्दल पोलीस अधीक्षकांनी पथकाचे कौतुक केले आहे.
