खडकपुरा भागात अतिक्रमण विरोधी मोहिमेला अडथळा करणाऱ्यांवर गुन्हे दाखल:

नांदेड, गोविंद मुंडकर| शहरातील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी आणि रस्ते मोकळे करण्यासाठी मागील काही दिवसांपासुन नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका आणि पोलीस विभाग यांच्यावतीने संयुक्तपणे शहरात विविध ठिकाणी अतिक्रमण विरोधी मोहीम राबवण्यात येत होती. परंतु काल दि.०४.०५.२०२६ रोजी खडकपुरा वाघी रोड येथे जमावाने अतिक्रमणची कारवाई चालु असताना महापालिका कर्मचाऱ्यास मारहाण केल्यानंतर पालिका प्रशासनाने वजिराबाद पोलीस स्टेशन येथे तातडीने गुन्हा दाखल करून पुन्हा त्याच ठिकाणी फौजफाट्यासह धडक कारवाई करत वाघी रोडवर महापालिकेने २ जेसीबीच्या सहाय्याने एकुण ५० ते ६० अतिक्रमण धारकावर धडक कारवाई करत अतिक्रणाचा सफाया केला आहे.

महानगरपालिका प्रशासनाकडून शहरातील मुख्य रस्ते आणि पदपथांवरील अनधिकृत अतिक्रमणे काढण्याची मोहीम राबवली जात आहे. सोमवार दि.०४.०५.२०२६ रोजी अतिक्रमण विभागाचे पथक कलामंदिर ते मिल रोड व त्यानंतर खडकपुरा भागात कारवाई करत असताना, खडकपुरा वाघी रोड येथील जमावातील काही व्यक्तींनी पथकातील कर्मचाऱ्यांशी हुज्जत घातली. वादाचे रूपांतर पुढे मारहाणीत झाले, ज्यात मनपा कर्मचाऱ्याला गंभीर दुखापत झाली आहे. या घटनेनंतर महानगरपालिकेच्या वतीने उपायुक्त स.अजितपालसिंघ संधु यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण पथक प्रमुख विशाल बालाजी सोनकांबळे यांच्या वतीने तातडीने वजिराबाद पोलीस स्टेशन येथे दि. ०५ मे रोजी FIR क्र.०२१२ अन्वये तक्रार देण्यात आली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून घटनेतील आरोपी मोहम्मद अतिक मोहम्मद खलील, शेख आयान शेख हबीब, उमरखान सत्तार खान व इतर तीन व्यक्ती राहणार सर्व खडकपुरा नांदेड यांच्या विरुद्ध शासकीय कामात अडथळा आणणे, मारहाण व शिवीगाळ करणे, धमकावणे इत्यादी कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

सदरील कारवाई पालिका आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे, पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार व अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली उपआयुक्त स.अजितपालसिंघ संधु यांच्या नेतृत्वात अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण विभाग व पोलीस प्रशासनाच्या संयुक्त पथकाने ही कारवाई पार पाडली. या कारवाईत वजिराबाद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक घोडके, सहाय्यक पोलीस निरीक्षक उमाकांत पुणे, हेड काँस्टेबल शेख, शहर वाहतुक शाखेचे नागरगोजे, रवि घाडगे व त्यांच्या पथकाच्या सहकार्याने अतिक्रमण विभागाचे सहाय्यक आयुक्त रावण सोनसळे, सहाय्यक आयुक्त मो.गुलाम सादेक, क्षेत्रिय अधिकारी रमेश चवरे, फरहतुल्ला बेग, अग्निशमन अधिकारी के.जी.दासरे, अतिक्रमण पथक प्रमुख दत्ता कल्याणकर, विशाल सोनकांबळे यांच्यासह महापालिकेचे ३० कर्मचारी तसेच पोलीस विभागातील २० कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.

महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, शहरातील अतिक्रमण निर्मूलन मोहीम यापुढेही सुरूच राहणार असून, शासकीय कामात अडथळा आणणाऱ्या आणि कर्मचाऱ्यांना मारहाण करणाऱ्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. याप्रकरणी संबंधितांविरुद्ध स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन मनपा उपआयुक्त स.अजितपालसिंघ संधु यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!