
नांदेड| क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नांदेड व नांदेड जिल्हा एकविध खेळ संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने विविध खेळांचे उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.


हे शिबीर दि. १५ ते २९ मे २०२६ या कालावधीत दररोज सकाळी ६.०० ते ८.०० आणि सायंकाळी ५.३० ते ७.३० या वेळेत नांदेड जिल्ह्यातील विविध ठिकाणी पार पडणार आहे.


या शिबिरासाठी जिल्ह्यातील एकविध खेळ संघटनांचे पदाधिकारी, क्लब, अकादमी तसेच क्रीडा प्रशिक्षक व मार्गदर्शक यांनी आपण घेऊ इच्छित असलेल्या खेळांचे नाव, प्रशिक्षणाचे स्थळ व वेळ (सकाळ/सायंकाळ) नमूद करून लेखी प्रस्ताव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नांदेड येथे सादर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


या मोफत प्रशिक्षण शिबिरात सहभागी होणाऱ्या सर्व खेळाडूंना जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. शिबिरात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या मुला-मुलींनी आपली नावे व संबंधित खेळ नमूद करून विहित नमुन्यात अर्ज करावा. संबंधित फॉर्म जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात उपलब्ध करून देण्यात येणार आहे.


नांदेड जिल्ह्यातील सर्व खेळ संघटना, क्लब व अकादमी यांनी या उपक्रमाची माहिती आपल्या स्तरावरून प्रसारित करून जास्तीत जास्त खेळाडूंना सहभागी करून शिबिर यशस्वी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी श्री. बालाजी शिरसीकर (खो-खो), श्री. चंद्रप्रकाश होनवडजकर (बुद्धीबळ) व श्रीमती शिवकांता देशमुखे (ॲथलेटिक्स) यांच्याशी संपर्क साधावा, असे जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेभंरे यांनी कळविले आहे.
