
नांदेड| जिल्ह्यासाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (एचपीसीएल) या सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीच्या तेल कंपनीने नांदेडमध्ये आपले नवीन प्रादेशिक कार्यालय सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.


या नव्या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात नांदेडसह लातूर, परभणी, हिंगोली, अकोला, वाशिम आणि यवतमाळ या एकूण ७ जिल्ह्यांचा समावेश असणार आहे. या जिल्ह्यांतील सुमारे ३०० पेट्रोल पंप आता थेट नांदेड कार्यालयाशी जोडले जाणार आहेत. यापूर्वी हे सर्व जिल्हे सोलापूर प्रादेशिक कार्यालयांतर्गत येत होते.


भौगोलिक अंतर आणि प्रशासकीय अडचणी लक्षात घेता नांदेडमध्ये स्वतंत्र कार्यालयाची मागणी अनेक दिवसांपासून होत होती, ती आता पूर्ण झाली आहे.


दरम्यान, एचपीसीएलचे प्रादेशिक व्यवस्थापक संतोष कुमार आणि क्षेत्र विक्री व्यवस्थापक तन्मय कोमटी यांनी Ashok Chavan यांची सदिच्छा भेट घेत नवीन कार्यालयाच्या कामकाजाची माहिती दिली.


या कार्यालयात १५ ते २० कर्मचाऱ्यांची टीम कार्यरत राहणार असून, पेट्रोल पंपांच्या वितरण, देखभाल आणि नवीन सेवांच्या अंमलबजावणीला आता अधिक गती मिळणार आहे. या निर्णयामुळे सातही जिल्ह्यांतील इंधन वितरण व्यवस्था अधिक सक्षम होणार आहे.
