
नांदेड, गोविंद मुंडकर| नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या (मनपा) एका महत्त्वाच्या प्रकरणाची सुनावणी आता मंत्रालयात होणार आहे. शिवाजीनगर (झोन क्र. 3) येथील कोनाळे कोचिंग क्लासेसच्या अवैध बांधकामाबाबत आणि सहाय्यक आयुक्त रमेश चवरे यांच्या नियुक्तीवर प्रश्न उपस्थित झाल्यामुळे हे प्रकरण चर्चेत आले आहे.


या संदर्भात नगर विकास विभागाच्या अवर सचिवांनी मनपाकडून चौकशी अहवाल मागवला होता. मात्र मनपाने या पत्राकडे दुर्लक्ष केल्याचे समोर आले. त्यामुळे अवर सचिव जयंत वाणी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सर्व कागदपत्रांसह 11 मे 2026 रोजी मंत्रालयात उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत.


कोनाळे कोचिंग क्लासेसच्या अवैध बांधकामाबाबत 2023 मध्येच नोटीस देण्यात आली होती. त्यानंतर सप्टेंबर 2025 मध्ये पुन्हा नोटीस देण्यात आली. तरीही अद्याप ठोस कारवाई झालेली नाही. 2024 मधील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आधार घेत कारवाई टाळली जात असल्याचा आरोप आहे.


या प्रकरणाचा पाठपुरावा दीपक कसबे यांनी केल्यामुळे आता मंत्रालय स्तरावर सुनावणी होत आहे. दरम्यान, मनपा आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत.


या प्रकरणात नांदेड वाघाळा महानगरपालिकेची भूमिका स्पष्ट, सत्य आणि व्यवस्थित आहे. अशी माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली. या सुनावणीच्या निकालाकडे नांदेडमधील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
