
रेल्वे मंत्री आणि मुख्यमंत्र्यांशी दूरध्वनीवरून चर्चा



नांदेड| भारतीय रेल्वेने ‘दक्षिण तटीय रेल्वे’ या नवीन झोनची निर्मिती प्रक्रिया सुरू केली असून, त्या पार्श्वभूमीवर नांदेड रेल्वे विभाग ‘मध्य रेल्वे’ला जोडण्याची आग्रही मागणी माजी मुख्यमंत्री व खासदार अशोकराव चव्हाण यांनी केली आहे.



या संदर्भात त्यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सविस्तर पत्र पाठवून त्यानंतर दूरध्वनीद्वारे चर्चा केली. दक्षिण तटीय रेल्वे झोनच्या निर्मितीनंतर दक्षिण मध्य रेल्वेतील सध्याच्या सहा विभागांपैकी तीन विभाग नवीन झोनमध्ये समाविष्ट केले जाणार आहेत, तर नांदेडसह उर्वरित तीन विभाग दक्षिण मध्य रेल्वेकडेच कायम ठेवण्याचे प्रस्तावित आहे.


मात्र, महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, सोलापूर, भुसावळ आणि नागपूर हे पाचही विभाग मुंबई मुख्यालय असलेल्या ‘मध्य रेल्वे’ झोनमध्ये असताना केवळ नांदेड विभागच सिकंदराबाद मुख्यालय असलेल्या ‘दक्षिण मध्य रेल्वे’त असणे असंयुक्तिक असल्याचे खा. चव्हाण यांनी निदर्शनास आणून दिले.


खा. अशोकराव चव्हाण यांनी पत्रात खंत व्यक्त केली की, दक्षिण मध्य रेल्वेकडून नांदेड विभागाला समन्यायी वागणूक मिळत नाही. भौगोलिक, भाषिक व प्रशासकीय सुलभतेच्या दृष्टिकोनातून नांदेड विभाग मध्य रेल्वे झोनच्या अंतर्गत असणेच संयुक्तिक आहे. दक्षिण मध्य रेल्वेकडून नांदेड विभागातील उड्डाणपूल, भुयारी मार्ग आणि स्थानकांतील मूलभूत सुविधांची कामे वेळेवर केली जात नाहीत.
शिवाय, रेल्वेचे वेळापत्रकही प्रामुख्याने तेलंगणातील प्रवाशांच्या सोयीनुसार ठरवले जात असल्याने मराठवाड्यातील प्रवाशांना मोठा फटका बसत आहे. नांदेड विभाग मध्य रेल्वेला जोडण्याची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित असून, त्यासाठी अनेक लोकप्रतिनिधींनी निवेदने दिलेली आहेत. सध्या होत असलेल्या झोनच्या विभाजनामुळे ही बहुप्रतिक्षित मागणी पूर्ण करण्याची हीच योग्य वेळ असल्याचे खा. चव्हाण यांनी यावेळी सांगितले.
