
हदगाव, गौतम वाठोरे| शहरातील पंचशील उच्च माध्यमिक विद्यालय (आदर्श विद्यार्जन मंडळ संचलित) यांनी इयत्ता बारावीच्या निकालात यंदाही उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखत उल्लेखनीय कामगिरी नोंदवली आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या ऑनलाईन निकालात विद्यालयाच्या विज्ञान शाखेचा ९१ टक्के, तर कला शाखेचा ८३ टक्के निकाल लागला आहे.


विज्ञान शाखेत एकूण १७७ विद्यार्थी परीक्षेला बसले होते, त्यापैकी १६१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये कुमारी आरती दत्ता शिंदे (८६.३३%) यांनी प्रथम क्रमांक पटकावला. कुमारी पूजा शिवाजी वाघमारे (७४.६७%) यांनी द्वितीय, तर कुमारी प्रज्ञा सत्यप्रकाश कुंभकर्ण (७२.६७%) आणि शुभम शंकर राठोड (७१.३३%) यांनी तृतीय क्रमांक मिळवला.


कला शाखेत १६७ पैकी १३९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. गंगाराम दिगंबर झाडे (८०.१७%) यांनी प्रथम, कुमारी पल्लवी रावसाहेब वानखेडे (७८.३३%) यांनी द्वितीय, तर कुमारी प्रज्ञा प्रदीप पाईकराव (७७.८३%) यांनी तृतीय क्रमांक मिळवला. तसेच अभय गौतम काळबांडे (७६.१७%) व कुमारी दिपाली बालाजी गायकवाड (७५.८३%) यांनी विशेष यश संपादन केले.


या घवघवीत यशाबद्दल संस्थेचे सचिव सुनील हरिहरराव सोनुले व संचालक मंडळाने विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. प्राचार्य अनिल दस्तूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्राध्यापक व कर्मचाऱ्यांच्या मेहनतीमुळे हे यश शक्य झाल्याचे सांगण्यात आले.


विद्यालयाच्या यशामुळे पालक व परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, यशस्वी विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
