
हिमायतनगर| जिल्हा परिषद बांधकाम उत्तर विभागात प्रभारी कार्यकारी अभियंत्यांच्या कारकिर्दीत विकासकामांच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, निकृष्ट कामे, अंदाजपत्रकाकडे दुर्लक्ष आणि कंत्राटदारांच्या मर्जीप्रमाणे सुरू असलेल्या कारभारामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी उसळली आहे.


नियमित कार्यकारी अभियंत्यांची बदली झाल्यानंतर प्रभारी अधिकाऱ्यांकडे सूत्रे गेल्यापासून कामांच्या दर्जात लक्षणीय घसरण झाल्याची अनेक उदाहरणे समोर येत आहेत. रस्ते व इतर बांधकाम प्रकल्पांमध्ये प्रत्यक्ष कामाची गुणवत्ता खालावलेली असताना, कंत्राटदारांची बिले मात्र मंजूर झाल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.


अनेक ठिकाणी डांबरीकरण व सिमेंटीकरण अपूर्ण असतानाही कामे पूर्ण दाखवून आर्थिक व्यवहार उरकले जात असल्याचा संशय व्यक्त होत आहे. परिणामी, कोट्यवधींचा निधी खर्च होऊनही नागरिकांना दर्जेदार सुविधा मिळत नसल्याची तीव्र भावना व्यक्त केली जात आहे.



विशेष म्हणजे, प्रभारी अभियंत्यांच्या स्वतःच्या तालुक्यात व विधानसभा क्षेत्रातच कामांची अवस्था चिंताजनक असल्याचे बोलले जात आहे. “जन्मभूमी आणि कर्मभूमीतच अशी परिस्थिती असेल, तर इतर भागात काय चालले असेल?” असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. माहूर, किनवट, देगलूरसह अन्य तालुक्यांतूनही अशाच तक्रारी पुढे येत असल्याने प्रशासनाविषयी असंतोष वाढताना दिसत आहे.


दरम्यान, जिल्हा परिषद बांधकाम उत्तर व दक्षिण विभागाच्या कामकाजाकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याची टीका होत आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी, अधीक्षक अभियंता व मुख्य अभियंता यांनी तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी आणि कामांच्या गुणवत्तेची जबाबदारी निश्चित करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे. अन्यथा महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर जनआक्रोश आंदोलनात रूपांतरित होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सवना–पार्डी रस्ता ‘कागदोपत्री’ पूर्ण? प्रत्यक्षात उघडकीस निकृष्ट काम
सवना (ज) ते पार्डी (ज) मार्गाच्या सिमेंटीकरण व डांबरीकरणासाठी सुमारे एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. या कामासाठी माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी विशेष प्रयत्न केले होते. मात्र प्रत्यक्षात कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

मागील वर्षी करण्यात आलेल्या सिमेंट रस्त्याचा वरचा थर मोठ्या प्रमाणात उखडल्याचे दिसत आहे, तर डांबरीकरणही निकृष्ट दर्जाचे झाल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे. विशेष म्हणजे, काँक्रीटीकरण पूर्ण न होता देखील ते पूर्ण झाल्याचे दाखवून बिल काढल्याची चर्चा रंगली आहे.
या कामाची सखोल चौकशी करून प्रत्यक्षात किती व कोणत्या दर्जाचे काम झाले, याचा खुलासा तातडीने करावा, अशी मागणी सवना (ज), पार्डी (ज) व टेंभी येथील ग्रामस्थांनी केली आहे. अन्यथा महाराष्ट्र दिनी लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.
