वाजेगाव ग्रामपंचायतीत निधी अपहार प्रकरण; सरपंच जमील अहमद शेख अटकेत

नवीन नांदेड| नांदेड तालुक्यातील वाजेगाव ग्रामपंचायतीत शासकीय निधीच्या अपहाराचा मोठा प्रकार उघडकीस आला असून, या प्रकरणी सरपंच जमील अहमद शेख यांच्यासह तत्कालीन ग्रामसेवक आणि इतर संबंधितांविरुद्ध ग्रामीण पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पत्रकार लतीफखान पि. पिरखान पठाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा नोंदवण्यात आला. तक्रारीनुसार, सन 2010 पासून ग्रामपंचायतीवर वर्चस्व असलेल्या सरपंच शेख यांनी विविध आर्थिक व्यवहारांमध्ये अनियमितता केल्याचा आरोप आहे.

तक्रारीनुसार, 11 एप्रिल 2016 रोजी निधन झालेल्या महिलेच्या नावाने 6 ऑगस्ट 2016 रोजी बँकेतून 12 हजार रुपये काढण्यात आले. या व्यवहारात तत्कालीन ग्रामसेवक एस.एस. देशमुख यांची मदत घेतल्याचा आरोप आहे.

ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक खात्यातून 28 ऑगस्ट 2015 रोजी विविध धनादेशांद्वारे 1 लाख 44 हजार रुपये स्वतःच्या नावावर काढल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच संगनमताने एकूण 1 लाख 56 हजार रुपयांचा अपहार केल्याचे तक्रारीत नमूद आहे.

8 सप्टेंबर 2016 रोजी एका व्यक्तीच्या नावाने 14 लाख 20 हजार 700 रुपयांचा धनादेश वटवून दलित वस्ती सुधारणा कामासाठी खर्च दाखवण्यात आला. मात्र, या खर्चाची कोणतीही नोंद ग्रामपंचायत कार्यालयात नसल्याचे समोर आले आहे. तत्कालीन उपसरपंचांनी विरोध केल्यानंतर त्यांना अडचणीत आणण्यासाठी त्यांच्या खात्यावर 10 हजार रुपये जमा केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

चौकशी अहवालात अपहार सिद्ध 
पंचायत समितीच्या विस्तार अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीत निधी अपहार झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले तसेच सुमारे 2 कोटी 84 लाख रुपयांची वसुली करण्याचे निर्देश दिले होते.

या प्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम 408 (विश्वासघात), 420 (फसवणूक), 465, 467, 468, 471 (बनावट कागदपत्रे) आणि 120-ब (कटकारस्थान) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रमुख ओमकांत चिंचोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सरपंच जमील अहमद शेख यांना अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे. या कारवाईमुळे वाजेगाव परिसरात मोठी खळबळ उडाली असून, ग्रामपंचायत कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!